वरोरा –
नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर विजयी झाल्या. प्रतिभा धानोरकर खासदार बनल्याने वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदारकीचा पदभार सोडला आहे. वरोरा विधानसभा क्षेत्र आता आमदार रहित आहे. त्या काँग्रेस पक्षाच्या असल्याने परिणामी वरोरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षात स्थानिक पातळीवर विधानसभेकरीता नविन नेतृत्वाची गरज निर्माण झाली आहे.
वरोरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाच्या सीटिंग आमदार होत्या म्हणून आगामी विधानसभा क्षेत्रात वरोरा विधानसभा ही काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस कडून आगामी विधानसभेकरीता नविन नेतृत्वाची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक राजु चिकटे, भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, डॉ. हेमंत खापने व इतर कार्यकर्त्याची नावे चर्चेत आहेत.
लोकसभा निवडणुकी दरम्यान प्रतिभा धानोरकर यांच्यावर परीवारवादाचा आरोप होत होता. त्यावेळी समाजापुढे धानोरकर यांनी बोलून दाखविले होते की यानंतर घरातच पदे न देता समाजातील इतर नेतृत्वाला संधी देवू. त्यानुसार वरोरा विधानसभेत आगामी निवडणुकीकरीता खासदार धानोरकर घरातील उमेदवार न देता समाजातील नेतृत्वाला संधी देतील अशी सर्वांना आशा आहे. त्यानुसार राजु चिकटे यांचे नाव सध्या प्रथम क्रमांकावर आहे.
राजु चिकटे हे वरोरा तालुक्यातील चारगाव ग्रामपंचायतचे सरपंच आहेत. ग्रामपंचायत सरपंच संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक आहेत. ग्रामीण भागातून त्यांच्या सामाजिक व राजकीय जीवनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी समस्यांची त्यांना चांगली जाणीव आहे. ते वरोरा येथील एका शाळेत शिक्षक आहेत. त्यांचा सामाजिक व राजकीय प्रवास उल्लेखनीय राहिला असून त्यांनी बहुआयामी राहून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. अशा नेतृत्वाला संधी मिळाल्यास वरोरा विधानसभा क्षेत्रात एका उच्चशिक्षित, बुद्धिजीवी सामाजिक, शेतकरी पुत्राला संधी मिळाल्या सारखं होईल, अशी चर्चा आहे.
त्यामुळे पक्ष नेमकी कुणाला संधी देतील, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.