भद्रावती :
महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपली आहे. श्रावण मास संपल्यानंतर महिनाभरात निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी वरोरा विधानसभा क्षेत्रात उमेदवारांची एकच गर्दी झालेली आहे. पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील अनेक उमेदवार तयारीला लागले आहेत. विधानसभा क्षेत्रातीलच नाही तर पार्सल उमेदवार देखील नशीब आजमावण्यासाठी कार्यरत झाले आहेत. गेली पाच वर्षे न दिसलेले चेहरे सुध्दा दिसायला लागले आहेत. कुठे छत्री, रेनकोट वाटप तर कुठे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण सुरु आहे. गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा, रक्तदान शिबिर, वाढदिवस कार्यक्रम, आदी सर्वच उपक्रम राबविल्या जात आहेत. सामाजिक उपक्रम राबवून, प्रकाशझोतात येवून, मतदारांना आपल्या कडे आकृष्ट करण्याचे सर्व उपाय केल्या जात आहे. सोशल मीडियावर भावी आमदारचे ग्राफिक्स वायरल होत आहे. काहींनी तर विधानसभा क्षेत्रात भावी आमदार म्हणून बॅनरबाजी देखील केली आहे. जनतेपर्यंत पोहोचण्याचा सोपा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरात सुरु आहे.
या सर्व उपक्रमात आणखी एक विशेष उपक्रम म्हणजे स्नेहभोजन कार्यक्रमांची रेलचेल होय. कुठे गुप्तता पाळून तर कुठे उघडपणे वेज-नॉनवेज जेवणावळी सुरु आहेत. गंमत म्हणजे स्नेहभोजनाचे आमंत्रण देवून बोलाविल्या जाते व आधी भाषणबाजी व प्रचाराचे कार्यक्रम घेतल्या जातात. म्हणजे “भोजन भाषण ऐकूनच मिळते”, अशा प्रतिक्रिया सुद्धा सदर कार्यक्रमांना जाणाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
स्नेहभोजन हे एक निमित्त आहे, मात्र या माध्यमातून समाजातील विशिष्ट सक्रिय लोकं गोळा करायची, त्यांच्या समोर उमेदवार म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करायचे, त्यातून काही राजकीय मंडळी गोळा करायची व निवडणुकीसाठी भावी चेहरा म्हणून पुढे व्हायचे, असे सर्व प्रकार वरोरा विधानसभा क्षेत्रात सुरु आहेत.
यात आणखी एक विशेष गंमत म्हणजे काही चेहरे हे सर्वच भावी आमदारांच्या स्नेहभोजनात दिसतात. म्हणजे नेमके कोण कुणाकडे आहेत, हेच कळायला मार्ग नाही. काहींसाठी निवडणुका तर सणच असतात. उमेदवारालाही काम करणारे चेहरे हवे असतात, याचाच फायदा घेवून “जिधर दम उधर हम” अशा भूमिकेत हे चेहरे वावरत असतात.
निवडणुका आल्या की सक्रिय व्हायचे, सामाजिक उपक्रम दाखवायचे, आंदोलन करायचे, स्नेहभोजन दयायचे, मात्र पाच वर्षे जनतेच्या काय समस्या आहेत, विधानसभा क्षेत्रात कशाची उणीव आहे, याकडे ढुंकूनही बघायचे नाही, म्हणून कुणाच्या जेवणासाठी कुणाचे बांधील होवू नये, पावसाळी बेडूक कोण आहेत, हे लक्षात घ्यावे, व अशा सर्व प्रकारांना मतदारांनी ओळखावे तथा आपला आमदार ठरवावे, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणने आहे.