चंद्रपूर जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांकरिता ४७६ उमेदवार मैदानात.

79

चंद्रपूर-

चंद्रपूर जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्नबाजार समितीसाठी येत्या ३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी
काँग्रेस आणि भाजपा या दोन प्रमुख
राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार
मैदानात उतरविले असून, अर्ज मागे
घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर शुक्रवारी
उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले.
या १२ बाजार समितींसाठी ४७६ उमेदवार
मैदानात असून, ग्रामीण भागात आता
प्रचाराला वेग आला आहे.
दोन वर्षे कोरोना संक्रमणामुळे
शासनाने सर्वच निवडणुका स्थगित
केल्या होत्या. त्यामुळे अनेक ठिकाणी
मुदत संपूनही कृषी उत्पन्न बाजार
समितीच्या निवडणुकाही होऊ शकल्या
नव्हत्या. त्या निवडणुकांना आता मुहूर्त
मिळाला असून, स्थानिक स्वराज्य
संस्थांच्या निवडणुकीआधी बाजार
समितीची निवडणूक होत असल्याने
बाजार समित्यांवर वर्चस्वासाठी प्रमुख
राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची
केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण
१३ कृषी उत्पन्न बाजार समित्या असून
त्यापैकी सावलीवगळता पोंभुर्णा, ब्रह्मपुरी,
सिंदेवाही, राजुरा, कोरपना, वरोरा, मूल,
चंद्रपूर, भद्रावती, चिमूर, गोंडपिपरी आणि
नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी
निवडणूक होत आहे. यातील मूल, वरोरा,
चिमूर, भद्रावती, वरोरा, राजुरा या बाजार
समित्या आर्थिकदृष्ट्या सक्षम समजल्या
जात असून, यावर कब्जा करण्यासाठी
काँग्रेस आणि भाजपाने कंबर कसल्याचे
दिसून येत आहे.
प्रत्येक बाजार समितींमध्ये सहकारी
संस्था, ग्रामपंचायत, व्यापारी अडते आणि
हमाल-मापारी असे चार मतदार संघ
असून, या मतदारसंघातून संचालकांची
निवड केली जाणार आहे. २० एप्रिल
रोजी उमेदवारी अर्ज मागे घ्यावयाच्या
शेवटच्या दिवसानंतर ४७६ उमेदवार
मैदानात असून, सध्या प्रचाराला वेग
आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.