डॉ अशोक जीवतोडे यांना दुबई येथे आंतरराष्ट्रीय लाईफ टाईम अचिवमेंट अवॉर्ड

169

चंद्रपूर : 

प्रसार माध्यम क्षेत्रातील लोकमत या मोठ्या व प्रतिष्ठित समूहाद्वारा शैक्षणिक व सामाजीक क्षेत्रातील योगदानाबद्दल चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी तथा विदर्भवादी ओबीसी नेते प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांना आंतरराष्ट्रीय लाईफ टाईम अचिवमेंट अवॉर्ड देण्यात आला आहे. लोकमतद्वारे देशाबाहेर प्रथमत:च आयोजित करण्यात आलेला सदर पुरस्कार सोहळा काल दिनांक २८ मे ला दुबई येथील ग्रँड हयात हॉटेल मधे पार पडला. यावेळी त्यांच्या अर्धांगिनी डॉ. सौ. प्रतिभाताई जीवतोडे सोबत होत्या.

दुबई येथील सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे वन आणि सांस्कृतिक कार्य, कॅबिनेट मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, लोकमत मीडिया ग्रुपचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, अब्दुल रहमान फलकनाझ, निकार्ड ग्रुप (दुबई) चे अध्यक्ष पारस शहदादपुरी, डेन्युडा ग्रुप (दुबई) अध्यक्ष रीझवान साजन, अल आदिल ग्रुप अध्यक्ष धनंजय दातार, अभिनेत्री नुसरत भारुचा, हाजी अरफत शेख, मुल्क इंटरनॅशनलचे अध्यक्ष शाजी उल मुल्क, एन बी व्हेंचर (दुबई) चे व्यावस्थापकिय संचालक निलेश भटनागर, सीरोया ज्वेलर्स, ए.एल.पी. (दुबई) चंद्रप्रकाश सीरोया, एरीस ग्रुप (दुबई) चे अध्यक्ष सोहन रॉय, अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुरस्काराला उत्तर देताना डॉ. अशोक जीवतोडे यांनी नव्या युगात नविन पिढीच्या जळणघळणी नुसार शैक्षणिक बदल होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले तर ओबीसी चळवळीची माहिती दिली.

डॉ. अशोक जीवतोडे हे चांदा शिक्षण प्रसारक मंडळ या पूर्व विदर्भातील एकमेव सर्वात मोठ्या व जुन्या शिक्षण संस्थेचे मागील ३० वर्षांपासून सेक्रेटरी आहेत तथा जनता शिक्षण महाविद्यालयाचे मागील १८ वर्षांपासून प्राचार्य आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक शैक्षणिक प्रयोग करून संस्थेला यशस्वीरीत्या पुढे आणले आहे व संस्थेचा कारभार चोख सांभाळला आहे. सोबतच शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात ते सदैव अग्रस्थानी राहिले. विदर्भ विकास चळवळ तथा ओबीसी चळवळ यात सक्रिय भूमिका राबवून विदर्भ राज्याच्या व ओबीसी समाजाच्या उत्थानाकरीता ते झटत आहेत. विविध कार्यक्रम, आंदोलने, मोर्चे, पत्रव्यवहार यांचे माध्यमातून त्यांनी चळवळीला बळ देण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेवून त्यांना सदर आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

देशाबाहेर मिळालेल्या या पुरस्काराकरीता त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.