भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नविन संचालक मंडळासाठी उद्या दिनांक ३० एप्रिलला प्रत्यक्ष मतदान

68

भद्रावती :

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक उद्या दि. ३० एप्रिल रोजी होत आहे. तालुक्यातील जि. प. शाळा, भद्रावती, जि. प. शाळा, नंदोरी, जि. प. शाळा, चंदनखेडा, येथे एकूण आठ मतदान केंद्र राहतील. या मतदान केंद्रावर तब्बल १४०१ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातून शिवसेना (ठाकरे) गटातील शेतकरी सहकार शिवसेना पैनलचे मोहन व्यंकटी भुक्या हा उमेदवार आधीच अविरोध निवडून आलेला आहे. तर उर्वरीत सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण गट, सेवा सहकारी संस्था महिला राखीव गट, सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय गट, सेवा सहकारी संस्था विमुक्त जाती/भटक्या जमाती गट, ग्रामपंचायत सर्वसाधारण गट, ग्रामपंचायत अनुसूचित जाती/जमाती गट, अडते व व्यापारी गट, हमाल व मापारी गट या सर्व आठ गटातून एकूण १७ उमेदवार निवडून द्यायचे आहेत.

या निवडणूकीच्या रणसंग्रामात महाविकास आघाडीतील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे दोन्ही पक्ष आमनेसामने उतरले आहेत.

शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात शेतकरी सहकार शिवसेना पैनल ही निवडणूक लढवित आहे. तर काँग्रेस कडून खासदार बाळूभाऊ धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात शेतकरी विकास पैनल सदर निवडणूक लढतीत आहे. त्यामुळे या विधानसभा क्षेत्रातील आगामी राजकीय श्रेष्ठत्वाची रंगीत तालीम म्हणून देखील या निवडणुकीकडे बघितल्या जात आहे. म्हणून दोन्ही गटाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, असे जाणकारांचे मत आहे.

याच वरोरा विधानसभा क्षेत्रातील वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूकीच्या हाती आलेल्या निकालानुसार शिवसेना (ठाकरे) पक्षाचे वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे, सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय देवतळे, सामाजिक कार्यकर्ते जयंत टेमुर्डे, करण देवतळे, यांच्या शेतकरी सहकार परिवर्तन आघाडी पैनलच्या बाजूने मतदारांनी कौल देत एकूण १८ जागां पैकी ९ उमेदवार विजयी झालेत तर खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या पॅनल चे ८ उमेदवार विजयी झालेत व उर्वरित एका जागेवर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले.
त्यामुळे भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या उद्या (दि.३०) ला होणाऱ्या पंचवार्षिक निवडणूकीच्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत मतदार वरोऱ्याच्या निकालाची पुनरावृत्ती करतात काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून उपजिल्हा प्रमुख भास्कर ताजणे, तालुका प्रमुख तथा नगरसेवक नरेंद्र पढाल, भद्रावती नागरी सहकारी पत संस्थेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक व माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डूकरे, माजी नगरसेवक तथा गुरुजी फाऊन्डेशचे अध्यक्ष प्रशांत कारेकर, अखील भारतीय सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष तथा  पानवडाळा ग्रा.पं. सरपंच प्रदिप महाकुलकर, मुधोली ग्रा.पं.सरपंच बंडू पा. नन्नावरे,नंदोरी ग्रा.पं. उपसरपंच मंगेश भोयर, मुरसा ग्रा.पं. उपसरंपच सुनिल मोरे, भद्रावती कृ. उ. बा.स. च्या माजी उपसभापती अश्लेषा जीवतोडे- भोयर, शांता रासेकर यांच्यासह  तालुक्यातील ग्रा.पं. सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, सेवा सहकारी संस्थेचे पदाधिकारी व सदस्य यांच्यासह असंख्य शिवसैनिक व कार्यकर्ते तथा काँग्रेस पक्षाकडून तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, शहर अध्यक्ष सूरज गावंडे, भोजराज झाडे, नगरसेविका रेखाताई कुटेमाटे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुधीर मुडेवार, पांडुरंग आगलावे, महिला तालुका अध्यक्ष वर्षा ठाकरे, महिला शहर अध्यक्ष सरीता सुर, मंगेश मत्ते, चंदू दानव, ईश्वर निखाडे, निलेश पिंगे, या सर्वांनी संपूर्ण मतदार क्षेत्र पिंजून काढला आहे. त्यामुळे या सर्वांमध्ये कुणाची मेहनत उद्या फळास येईल, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.