एड्स जाणा, एड्स टाळा

194

*१ डिसेंबर जागतिक एड्स दिन विशेष*

*एड्स जाणा, एडस् टाळा”**

#HIV #AIDS #AWARENESS

जागतिक एडस दिनानिमित्य जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन* #WorldAIDSDay

*या वर्षीचे घोषवाक्य “Equalize” (एचआयव्ही सह जगणाऱ्याकरीता आपली एकता, आपली समानता)*

*सन २०२१-२२ मध्ये संपूर्ण जिल्हयात कार्यरत आयसीटीसी माध्यमातून सामान्य तपासणी ८०६६५ व गरोदर महिलांची तपासणी ४६९३४ इतकी करण्यात आली असून यापैकी २२४ इतके एचआयव्ही बाधित आढळले व त्यापैकी २२२ हे औषधोपचारावर आणण्यात आले.*

चंद्रपूर :

दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. जगभर पसरलेल्या एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी आणि या रोगामुळे मरण पावलेल्यांचा शोक व्यक्त करण्यासाठी हा दिवस पाळावा, असे संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केले आहे. सरकारी आणि आरोग्य अधिकारी, अशासकीय संस्था आणि जगभरातील व्यक्ती एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणावरील शिक्षणासह हा दिवस साजरा करतात.

चंद्रपूर हा एचआयव्ही एड्सच्या बाबतीत महाराष्ट्रात संवेदनशील जिल्हा आहे. जिल्हयात राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरापासून जिल्हास्तरापर्यंत एचआयव्ही विषयक समुपदेशन व एचआयव्ही चाचणी सुविधा निशुल्क देण्यात येते. त्याच बरोबर गुप्तरोग्यांकरीता मोफत औषधोपचार व अन्य समुपदेशक सुविधा DSRC केंद्राच्या मार्फत देण्यात येत आहे, तसेच एआरटी उपचार सुध्दा एआरटी केंद्रातून देण्यात येतात. त्याच प्रमाणे अतिजोखिम वर्तन गट, ट्रकर्स, स्थलांतरित कामगार व ग्रामीण भागाकरिता अनुदानित संस्था द्वारे प्रकल्प राबविण्यात येत आहे.

जिल्हयात सद्यस्थितीत एक जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष, तालुकास्तरावर १४ आयसीटीसी, गुप्तरोग करीता जिल्हास्तरावर एक सुरक्षा क्लीनिक केंद्र, औषधोपचार साठी २ एआरटी केंद्र, ६ लिंक एआरटी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर 62F-आयसीटीसी, जिल्हाभरात 110 PPP सेंटर, ब्लड स्टोरेज एकूण ५, ग्रामीण भागातील १०० गावासाठी १ लिंक वर्कर स्कीम (प्रकल्प), १ विहान प्रकल्प, १ ट्रकर्स प्रकल्प, स्थलांतरीत कामगारांसाठी २ मायग्रंट प्रकल्प व एचआरजी कोअर ग्रुप साठी १ प्रकल्प, अशी सुविधा केंद्राची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत एच.आय.व्ही. एड्स विषयीची माहीती व त्या संदर्भात जनजागृतीचे उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासना मार्फत विस्तृत रूपरेषा आखण्यात आलेली आहे. या वर्षी देखील दरवर्षी प्रमाणे जिल्हास्तरावर व पूर्ण जिल्हयात जागतिक एड्स दिन/मास राबविण्यात येणार आहे. त्या निमित्ताने जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष सामान्य रुग्णालयाद्वारे जिल्हाभरात अनेक स्वयंसेवी संस्थाच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या वर्षीचे घोषवाक्य “Equalize” (एचआयव्ही सह जगणाऱ्याकरीता आपली एकता, आपली समानता) हे आहे. प्रभातफेरीचे आयोजन केलेले असून १ डिसेंबर ला सकाळी ८ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे सामुहीक एडस् विरोधी प्रतिज्ञा वाचन करण्यात येणार असून यावेळी विविध घोषवाक्य “एडस् जाणा, एडस् टाळा”, यासारख्या घोषवाक्याद्वारे तसेच रांगोळीच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री राम पानगंटीवार यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे.

विहान प्रकल्पाअंतर्गत डिसेंबर-२०२२ ला एचआयव्ही बाधित मुलांसाठी प्रोटीन पावडर वाटप कार्यक्रम घेण्यात येत असून एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्तीसाठी शासनाच्या विविध योजना पोहोचविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शनाचे कार्यक्रम देखील आयोजीत करण्यात आलेले आहे. जिल्हा एड्स नियंत्रण कक्षा द्वारे जनजागृती स्पर्धा घेण्यात येत असून यामध्ये जास्तीत जास्त संख्येने युवा पिढीने भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच संपूर्ण जिल्हयातील प्रत्येक तालुक्यामध्ये एकात्मिक सल्ला व तपासणी केंद्राअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले असून त्यांच्या व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थे अंतर्गत कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, संकल्प बहुउद्देशीय, ग्राम विकास संस्था, लिंक वर्कर प्रकल्प, जनहिताय मंडळ, मायग्रंट प्रकल्प, नोबल शिक्षण संस्था, ट्रकर्स व मायग्रंट प्रकल्प, संबोधन ट्रस्ट कोअर प्रकल्प, या संस्था द्वारे सीबीएस चाचणी शिबिराचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेले आहे.

१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधी मधे “मातेकडून होणाऱ्या बाळाला एच आय व्ही / एड्स संसर्गापासून प्रतिबंध करणे”, या बाबतचा संदेश घेऊन जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा संदेश पोहचविण्यात यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेक यांनी केले आहे.

एच.आय.व्ही./एड्स बाबतीत जिल्हयाची सद्यस्थिती पाहता सन २०२१-२२ मध्ये संपूर्ण जिल्हयात कार्यरत आयसीटीसी माध्यमातून सामान्य तपासणी ८०६६५ व गरोदर महिलांची तपासणी ४६९३४ इतकी करण्यात आली असून यापैकी २२४ इतके एचआयव्ही बाधित आढळले व त्यापैकी २२२ हे औषधोपचारावर आणण्यात आले. त्याचबरोबर एचआयव्ही बाधित रुग्णांच्या जोडीदार यांची देखील तपासणी करण्यात आली, त्यामध्ये एकूण १४५ जणांची तपासणी करण्यात आली.

तालुका स्तरावर सर्व जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामिण रूग्णालय, आयसीटीसी अंतर्गत रेड रिबन क्लब मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.