भद्रावती : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली प्रादेशिक वनक्षेत्रात प्रवेश करून वन कर्मचाऱ्यांशी वाद घातला तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांना मोबाइलवर शिवीगाळ केली असल्याचा आमचेवर आरोप करण्यात आलेला आहे. मात्र या प्रकरणात आमचा काहीही संबंध नसताना आमच्या उपस्थितीत न घडलेल्या घटनेचे आम्ही दोषी झालो आहे, असे वासुदेव ठाकरे आणि अक्षय बंडावर यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे.
वासुदेव ठाकरे यांनी पुढे असे सांगितले की, आमच्यावर झालेले आरोप पूर्णतः खोटा आहे. हे खरे आहे की आम्ही काही मित्र रात्रीच्या वेळेस जंगल सफारी करीता गेलेलो होतो. मात्र तिथे असला कोणताही प्रकार घडला नाही उलट वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांचे सोबत फोन वर बोलून अगदी सलोख्याचे संबंध ठेवून तिथून परत निघालो. तोपर्यंत सर्व काही ठीक होते. मात्र रात्री घरी गेल्यावर आमचे सोबत असलेल्या माजरी येथील एका सहकाऱ्याने वनपरिक्षेत्र अधिकारी यांना घरी गेल्यावर रात्रोला भ्रमणध्वनी करून शिवीगाळ केली. यात त्यांची काय मतभिन्नता झाली व घरी परत आल्यावर त्या सहकाऱ्याने असे का केले याची आम्हाला कल्पना नाही व त्या सहकाऱ्याने असे केल्याबाबत आम्हाला दुसऱ्या दिवशी माहित झाले. मात्र एकाने केलेल्या चुकीचा परिणाम आमचेवर झाला व सरसकट सोबत असलेल्या सर्वांवर अदखलपात्र गुन्हे नोंदविण्यात आले.
पुढे ठाकरे म्हणाले की, मी सुरवाती पासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करीत आलेलो आहों, त्यामुळे अनेक नकळत घडणाऱ्या अनुचित घटनांना सामोरे जावे लागते. या अगोदरही घडलेल्या काही गुन्ह्यात मी केवळ सहआरोपी आहे. त्यातल्या काही प्रकरणात उच्च न्यायालयाने माझी निर्दोष सुटका केलेली आहे. जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे नोंद असलेले आरोपी मोकाट फिरत आहे. मात्र चार गुन्हे नोंद असताना माझेवर तडीपारीची कारवाई झालेली आहे. हा सर्व प्रकार मला राजकीय षडयंत्रात फसविणारा आहे. सदर वर्तमान प्रकरणात देखील माझा काहीही संबंध नसताना अकारण गुंतविण्यात आलेले आहे. तरीही मी कायदेशीर बाबीला सामोरे जायला तयार आहे. या सर्व प्रकाराबाबत भविष्यात मी न्याय मागणार आहे. माझे वर तडीपारीची कारवाई झालेली आहे त्यावर स्थगिती मिळू नये यासाठी सदर गुन्ह्यात मला फसविण्यात आले आहे, असे वासुदेव ठाकरे यांनी सांगितले आहे.
————————————–
वर्जन – राजकारण आणि व्यवसायात यशस्वी होत असल्याने काही राजकीय पुढारी पडद्यामागून मला फसवीण्याचा कट रचत आहे. मला बदनाम करण्यासाठी राजकीय शत्रू यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयास करीत आहे. ज्या राजकीय नेत्यांसाठी मी काम केले होते, त्या नेत्यांच्या सांगण्यावरून व शहरातील काही माजी स्वीकृत सदस्यांच्या साक्षिवरून माझेवर सदर कारवाई लादण्यात आली आहे. जेव्हा की त्या स्वीकृत सदस्यांवर माझे पेक्षा अधिक गुन्हे आहेत. माझ्यावर अनेकदा हल्ल्याचा प्रयत्न सुद्धा झाला. आरएफओ सोबत घडलेल्या घटनेत माझा काहीही संबंध नाही. पोलिसांनी याप्रकरणी योग्य चौकशी करून सत्य समोर आणावे.
– वासुदेव ठाकरे