पंधरा दिवसात सोयाबीनची नुकसान भरपाई द्या, अन्यथा तीव्र आंदोलन … किशोर टोंगे यांचा प्रशासनाला इशारा

56

वरोरा:
आज दि. 3 ऑक्टोबर मंगळवार रोजी युवा नेते किशोर टोंगे यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मिळावी यासह विविध मागण्यांसाठी उपविभागीय कार्यालय वरोरा येथे शेकडो शेतकऱ्यांसह लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन केले.

वरोरा आणि भद्रावती तालुक्यात झालेल्या अति पावसामुळे आलेल्या येलो मोझाक या रोगामुळे सोयाबीनचे पीक पिवळे पडून समूळ नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे यात शेतकऱ्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने प्रशासनाच लक्ष वेधून घेण्याच्यासाठी किशोर टोंगे यांनी आंदोलन केले.

यावेळी बोलताना किशोर टोंगे म्हणाले की, आज दिवसभरात शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. शेतकरी हतबल, असाहाय्य असून सरकारच्या मदतीच्या अपेक्षेत तो आहे मात्र शासन पातळीवर कुठलीही गंभीरता दिसून येत नाही हे लाजिरवाने आहे.

जगाचा पोशिंदा म्हणजे बळीराजा असे ज्याचे वर्णन केले जाते तो आज अडचणीत असताना आणि आज त्याला मदतीची गरज आहे. शेतकऱ्याला अस्मानी संकटाने लुटलेले असताना सुलतानी संकट देखील त्याच्यावर घोंगावत आहे. मात्र, आम्ही हे होऊ देणार नाही यासाठी आम्ही लढत राहू, कदापि शांत बसणार नाही.

येत्या पंधरा दिवसात पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी तातडीने शेतकरी व सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावून तात्काळ पावले उचलावी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील ऊस व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री तातडीने बैठका घेऊन अनुदान वितरित करतात त्याच धर्तीवर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी पुढाकार घेऊन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्यशासनाला विशेष पॅकेज जाहीर करण्यास भाग पाडावे असे आवाहन देखील किशोर टोंगे यांनी केले.