आरटीओ विभागाच्या भरधाव स्कॉर्पिओने गायीला केले ठार

13

भद्रावती :

चंद्रपूर-नागपुर महामार्गावर घोडपेठजवळ आरटीओ कार्यालयाच्या स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एमएच ०४ के.आर. ६४३४ या वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या दुधाळू गायीला जबर धडक देवून जागीच ठार केले तथा त्याच कळपातील एक गाय जखमी केल्याची घटना घडली आहे. सदर घटना काल रविवार दिनांक ८ ला सायंकाळी ५:३० च्या दरम्यान घडली. मृत झालेली गाय घोडपेठ येथील शेतकरी विठ्ठल गोविंदा झाडे (५५) यांच्या मालकीची आहे तर जखमी झालेली गाय घोडपेठ येथील शेतकरी सुधाकर घोटकर यांच्या मालकीची आहे.

दररोज प्रमाणे शेतीची कामे आटोपून शेतकरी विठ्ठल झाडे व सुधाकर घोटकर हे त्यांची जनावरे घेऊन घराकडे निघाली होती. दरम्यान जनावरे गावाजवळ नागपूर चंद्रपूर महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या आरटीओ विभागाच्या स्कॉर्पिओ वाहनाने गायीला जबर धडक दिली. यात झाडे यांची गाय जागीच ठार झाली तर घोटकर यांची गाय गंभीर जखमी झाली. या दोन्ही गायी दुधाळू असल्याचे समजते. यात गाय मालकाचे खूप नुकसान झाल्याचे कळते.

दरम्यान काल दिनांक ८ ला घटनेनंतर सायंकाळी घडलेल्या प्रकाराची तक्रार देण्याकरिता गाय मालक, गावातील काही शेतकरी व सहकारी स्थानिक पोलीस स्टेशन मधे गेले असता ठाणेदार बिपीन इंगळे यांनी अपमानास्पद वागणूक दिली व तक्रारकर्त्यांनाच दमदाटी करत सदर प्रकरण सेटल करुन घ्या, असा सल्ला दिला. त्यावेळी त्यांनी लिखित तक्रार नोंदवून घेतली नाही. उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम यांना देखील घटनेची माहिती दिली, पण त्यांनीही फारसे गांभीर्याने घेतले नाही. आणि शेतकरी व सहकारी परत आले. विशेष म्हणजे सदर स्कॉर्पिओ वाहन त्यावेळी पोलीस स्टेशन मधे पार्क होते.

त्यानंतर आज (दि.९) ला गाय मालक व सहकारी चंद्रपूर येथे पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात गेले व त्यांना सर्व प्रकरणाची माहिती देवून लिखित तक्रार दिली. यात तक्रारकर्त्याने लिहिले आहे की, ठाणेदार बिपीन इंगळे यांचेकडे तक्रार देण्यास गेले असता, त्यांनी आधी सहकाऱ्यांचे मोबाईल काढून घेतले. मी तक्रार घेणार नाही, घेतली तरी ती १५ दिवस चौकशीत ठेवणार, माझी बदली होणार आहे, माझे कुणी काही वाकडे करु शकत नाही. मला खूप पॉवर आहे, सहकाऱ्यांना जास्त बोलाल तर तुमच्यावरच गुन्हे नोंदवू असे धमकावले, सदर प्रकरण सेटल करुन घ्या, असे म्हटल्याचे लिहिले आहे.

तक्रारीनंतर पोलीस अधीक्षक यांनी ठाणेदार बिपीन इंगळे यांना नविन कायद्याअंतर्गत सदर प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. आता ठाणेदार बिपीन इंगळे नेमकी काय भूमिका घेतात व कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर कारवाई करु, असे ठाणेदार बिपीन इंगळे यांनी म्हंटले आहे.

सोबतच जनतेला वाहतूक नियम सांगणारे आरटीओ विभाग कारवाईला कसा प्रतिसाद देतात, सुटीच्या दिवशी आरटीओची स्कॉर्पिओ एव्हढ्या भरधाव वेगात कुठे जात होती? गाडीत कोणते अधिकारी बसले होते? पोलीस विभाग व आरटीओ विभाग हे दोन्ही शासकीय विभाग संबंध जोपासणार नाही ना? या सर्वाकडेही लक्ष लागून आहे.