भद्रावती :
या चालू हंगामात सोयाबीनचे पीक निघून चार ते पाच महिने लोटले आहेत. मागील चार महिन्यांपासून राज्य शासनामार्फत सोयाबीन खरेदी सुरु आहे. परंतु सोयाबीन खरेदीचा वेग अतिशय संथ आहे. फेब्रुवारी महिना सुरु आहे, तरी अद्याप शेतकर्याची सोयाबीन खरेदी पूर्ण झाली नाही. शासन प्रत्येक वेळी तीन-चार दिवस मुदतवाढ देऊन सोयाबीन खरेदीचा फार्स करीत आहे. त्यामुळे ज्या शेतकर्यांनी नाफेडकडे नोंदणी केली आहे, त्या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन शासनाने खरेदी करावे. सर्व शेतकऱ्यांची सरसकट सोयाबीन खरेदी करून त्यांना हमीभाव देण्यात यावा, सोबतच सीसीआयने शेतकर्यांचा सर्व कापूस हमीभावाने खरेदी करावा अणि शेतकर्यांना न्याय द्यावा, अशी मागणी भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजने यांनी केली आहे.
शेतकरी वर्षभर शेतात राब राब राबतो, शेतातून पीक उगवतो, मात्र शेतकऱ्यांचे पीक बाजारात आले की त्याला उत्पन्नाच्या पटीने मालाला भाव मिळत नाही. त्यामुळे वर्षभराच्या मेहनतीचा मोबदला म्हणावा तसा फायदेशीर होत नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या कुटुंबात सतत गरिबी व सामान्य जीवन असते. शेतकरी मेहनत करायला मागे येत नाही मात्र त्याच्या मालाला मिळणारा भाव उत्पन्न खर्चाच्या तुलनेत चढा नसतो, म्हणून तो शेती करुन हतबल होतो. महागाई प्रचंड वाढली आहे. गेल्या काही वर्षात सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. परंतु शेतकऱ्यांचा मालाचा भाव कासवगतीने सरकत आहे. त्यामुळे याचा विचार राज्य शासनाने करावा, शेतमालाचा हमीभाव वाढवून द्यावा, त्याच हमिभावाने शेतमाल शासनामार्फत खरेदी व्हावा, अशी मागणी सभापती भास्कर ताजने यांनी केली आहे.