भद्रावती :
शहरात मागील अनेक वर्षांपासून घरफोडी, चैन स्नॅचिंग, बाईक चोरी आदी घटना वाढल्या आहेत. दिवसाढवळ्या घरफोड्या होतात. सार्वजनिक समारंभात व बाजाराच्या दिवशी चैन स्नॅचिंगच्या घटना घडतात. बाईक व इतर वस्तूंच्या चोऱ्या सुरु असतात. मात्र गेल्या कित्येक वर्षात या चोरींच्या घटनांवर अंकुश लावण्यास पोलिस प्रशासन हतबल झाले आहे. परिणामी नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना लुप्त होत चालली आहे.
शहरात गेल्या काही वर्षात आलेल्या ठाणेदारांच्या सततच्या बदल्या होत आहे. नविन ठाणेदार येतो, काही महिने काढतो व त्यांची बदली होते. याचा परिणाम शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर होत आहे.
या अगोदर शहरात प्रसिद्ध जैन मंदिर, नागमंदिर येथे मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडल्या आहेत. आयुध निर्माणी संरक्षण क्षेत्रात वाघाच्या शिकारीची घटना घडली होती. युवतीची मुंडण कापून केलेल्या हत्येने तर शहर हादरले होते. शहरातून ग्रामीण भागात अवैध दारूविक्री नित्याची आहे. अवैधरित्या गौण खनिज विक्री नित्याची आहे. अवैध वाहतूक नित्याची आहे, भंगार चोरी, अल्पवयीन बाईकस्वारांचा धुमाकूळ, बाईक व मोबाईल चोरी, घरफोड्या आदी अधून मधून होतच राहतात. लग्न समारंभात चैन चोरीच्या घटना घडत असतात. अनेक तक्रारी समोर येत नाहीत.
शहराच्या भवताल कर्नाटक एम्टा, अरबिंदो खाण, निप्पॉन डेंड्रो प्रकल्पबाधित, आदी औद्योगिक समस्या आहेत. येथे उद्योग व भूमिपुत्र असा मोठा संघर्ष आहे. यात पोलिसांची समन्वयाची भूमिका आवश्यक आहे. एकतर्फी कायदा व सुव्यवस्था सांभाळल्या जावू नये, अशी भूमिपुत्रांची अपेक्षा असते.
या सर्व घटना गेल्या काही वर्षातच घडल्या आहेत. मात्र या सर्व घटनांचा अभ्यास करुन शहरात एक ऍक्शन प्लॅन कोणत्याच ठाणेदाराने बनविला नाही. स्मार्ट पोलिस स्टेशनची भव्य इमारत उभी झाली. पण चोरांना पकडणारी स्मार्ट यंत्रणा तयार झाली नाही. तथापि घटनांवर अंकुश ठेवण्यास पोलिस प्रशासन अपयशी झाल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.
नविन ठाणेदार लता वाडिवे यांच्याकडून अपेक्षा
गेल्या कित्येक वर्षांच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच शहराला महिला ठाणेदार लाभल्या आहेत. त्या आता शहरात किती महिने राहतील, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. घरफोड्या, चैन स्नॅचिंग, अवैध दारूविक्री, सुगंधित तंबाखू विक्री, अवैध वाहतूक, अल्पवयीन बाईकस्वारांचा धुमाकूळ, खुनाच्या घटना, अवैध गौण खनिज विक्री, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, मानव व वन्यजीव संघर्ष आदी समस्या सोडविण्यास पोलिस निरीक्षक लता वाडिवे आक्रमक दिसतील, अशी अपेक्षा भद्रावतीकर करीत आहेत.