*भद्रावती नगरपालिका निवडणूक प्रचारात गाजत असलेले मुद्दे*
भद्रावती नगरपालिका निवडणूक प्रचारात शहराच्या विकासाचे प्रमुख मुद्दे ऐरणीवर आलेले आहेत. प्रामुख्याने गेल्या जुलै २०२५ महिन्यात भाडे वसुली करीता खासगी जागा मालकाकडून नगरपालिकेवर नगरपरिषद कार्यालयातील साहित्य जप्तीची कारवाई करण्याबाबत कोर्टाने दिलेल्या आदेशामुळे नगरपालिका व भद्रावती शहरावर जी नामुष्की ओढविली, या मुद्द्याला केंद्रस्थानी घेऊन काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उबाठा), बसपा प्रचार करीत आहे.
*माजी नगराध्यक्ष व उपाध्यक्षावर रोष*
राज्याच्या इतिहासात प्रथमच अशा एखाद्या नगरपालिकेवर कारवाई झाली असावी. भद्रावती नगरपालिकेवर झालेल्या कोर्ट कारवाईसाठी भाजप कडून नगराध्यक्ष पदाकरीता उभे असलेले माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर व शिवसेना (शिंदे गट) कडून उभे असलेले माजी उपाध्यक्ष प्रफुल चटकी यांना इतर पक्ष दोषी ठरवीत आहेत. कारण यांच्या कारकिर्दी नंतरच पालिकेवर सदर कारवाई झाली. त्यामुळे त्यांनी विगत १० ते १५ वर्षे पालिकेत जो कारभार सांभाळला, त्यात या कारवाईची पाळेमुळे असल्याचे प्रचारात बोलल्या जात आहे.
*नेमके काय झाले होते?*
भद्रावती नगर परिषदेने आठवडी बाजारासाठी भाडेतत्त्वावर घेतलेल्या खासगी जमिनीचे सुमारे ६६ लाख रुपये थकीत भाडे चुकते न केल्याने जमीनमालकांनी कायदेशीर कारवाई केली. वरोरा येथील दिवाणी न्यायालयाने जमीनमालकांच्या बाजूने निकाल देत भाडे वसुलीसाठी जप्तीचे अधिकार दिले. त्यानुसार जमीनमालकांनी नगर परिषद कार्यालयातील साहित्य जप्त केले. राजू गुंडावार, संजय गुंडावार आणि किशोर गुंडावार यांच्या ३०,०३३ चौरस फूट जमिनीवर २०१८ मध्ये नगर परिषदेने दरमहा ६६,००० रुपये भाड्याने आठवडी बाजार सुरू केला. सुरवातीला काही महिने भाडे चुकते झाले. पण नंतर थकबाकी वाढत गेली. जमीनमालकांनी वारंवार मागणी करूनही भाडे मिळाले नाही. अखेर त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने गुंडावार यांच्या बाजूने निकाल देत जप्तीचे आदेश दिले. गुंडावार यांनी नगर परिषद कार्यालयात जाऊन मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची, सोफे, जीप यासह विविध साहित्य जप्त केले. यावर नगर परिषदेजवळ एकरकमी रक्कम चुकती करण्यास पुरेसा पैसा नाही. ही रक्कम पाच टप्यांमधे चुकती करण्याचा प्रस्ताव गुंडावार यांना देण्यात आला. मात्र त्यांनी तो मान्य न करता जप्तीची कारवाई केली, असे मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांनी सांगितले.
*भद्रावती शहराची मान खाली करणारी घटना*
कोणताही शासकीय खजिना एकाच वेळी रिता होत नाही. तो हळूहळू गंगाजळीला लागतो. गेली १५ वर्षे एकाच परिवाराला, एकाच पक्षाला एकहाती सत्ता येथील जनतेनी दिली. दिवंगत बाळूभाऊ धानोरकर खासदार असताना, विद्यमान खासदार प्रतिभाताई धानोरकर आमदार असताना राज्य सरकार कडून मोठ्या प्रमाणात पालिकेला निधी प्राप्त झाला. जनतेच्या टॅक्स स्वरूपात देखील मोठा निधी गोळा होता. एव्हढा मोठा निधी विकास कामांकरिता खर्च होऊन देखील शहराचा भौतिक विकास झाला नाही. उलट पालिकेची तिजोरी रिक्त झाली. त्यामुळे झालेली कोर्टाची कारवाई ही नगरपालिका व शहराची मान खाली घालणारी घटना असल्याचा प्रचार जोरात सुरु आहे.
*प्राचीन वडाचे झाड तोडल्याच्या जखमा झाल्या जिवंत*
भद्रावती शहरात बाजार परिसरात मध्यभागी एक प्राचीन वडाचे झाड होते. या विशालकाय झाडावर मोठी जैवविविधता होती. मात्र आवश्यकता नसताना केवळ कृत्रिम म्युरल लावण्यासाठी सदर वडाचे झाड २०१८ मध्ये पालिकेने तोडून टाकले. त्यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर व उपाध्यक्ष प्रफुल चटकी होते. हा मुद्दा देखील सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोबतच या घटनेपासून शहरातील पर्यावरण प्रेमी नाराज आहेत.
*सराफा लाइन मधील दारू दुकानामुळे व्यापारी नाराज*
शहराच्या बाजार परिसरात मध्यभागी सराफा लाइन आहे. या लाइन मधेच माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या मालकीचे देशी दारुचे दुकान आहे. या दुकानामुळे बाजार लाइन मधील परिसर डिस्टर्ब झाला आहे. मद्यपी धुडगुस घालतात. भाजी मंडीच्या नवीन व बेवारस पडलेल्या इमारती मधे मद्य प्राशन करुन पडले असतात. त्यामुळे व्यापारी नाराज आहे. शैलेश कोठारी या सराफा व्यापाऱ्याने सोशल मीडियावर याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
*कमिशनखोरीचा व्हिडिओ व्हायरल*
निवडणूक काळात अनेक जुने, फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या एका माजी नगरसेवकाने पालिकेत कमिशनखोरी, कंत्राटदाराकडून टक्केवारी कशी घेतल्या जाते, विकास कामातील कोण किती टक्के घेतात, याबाबत बतावणी केली होती. त्याबाबतचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे.
*अख्खे शहर बनले बाजार अतिक्रमित*
कोरोना काळात शहरभर लागलेली भाजी व फळ विक्रेत्यांची दुकाने अजूनही तशीच असुन शहरात प्रवेश केल्यापासून तर संपूर्ण शहरभर रस्त्याच्या दुतर्फा भाजी व फळ विक्रेते बसले असतात. त्यांना अजून हक्काची जागा मिळाली नाही. फुटपाथ नावाची जागा शहरात दिसून येत नाही. भंगार व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणामुळे शहरात वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. हे सर्व मुद्दे प्रचारात दिसत आहे.
*करोडो रुपये लागत असलेली भाजी मंडी इमारत बेवारस*
तत्कालीन नगराध्यक्ष अनिल धानोरकर व उपाध्यक्ष प्रफुल चटकी यांच्या काळात करोडो रुपये खर्चून बांधण्यात आलेली भाजी मंडी इमारत बेवारस पडली आहे. त्यामुळे जनतेच्या टॅक्स चा दुरुपयोग झाल्याचे बोलले जात आहे.
*तलावातील घरात पाणी*
एवढ्या वर्षात शहरातील डोलारा तलावाच्या पाळीवर असलेल्या झोपडपट्टी वासियांना हक्काची घरे न मिळाल्याने प्रत्येक पावसाळ्यात तलाव भरत आला की तेथील रहिवाश्यांच्या घरात पाणी शिरते व जनजीवन विस्कळीत होते. त्यामुळे येथील नागरिक नाराज आहेत.
*निवडणुकीत गाजणारे मुद्दे*
काही महिन्याअगोदर नगरपालिकेवर झालेली कोर्ट कार्यवाही, न.प. तिजोरीतील ठणठणाट, सराफा लाइन मधील दारूचे दुकान, भाजी बाजार मंडी इमारतीचे बांधकाम, शहराच्या रस्त्यांवरील अतिक्रमण, शहराच्या मध्यभागी असलेल्या प्राचीन वडाच्या झाडाची कत्तल, विकास कामातील भ्रष्टाचार, एकाच परिवाराकडे सत्ता देऊनही न झालेला विकास, रस्ते, सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या, पिण्याचे पाणी, स्वच्छता, पर्यावरण, झोपडपट्टी विकास, तलावांचा प्रश्न, माजी नगरसेवकाचा पालिकेतील नगराध्यक्ष ते नगरसेवक पर्यंतचा कमिशनखोरी बद्दल दिलेला विवादित व्हिडिओ, आदी मुद्दे निवडणुकीच्या प्रचारात प्रमुख आहेत.











