मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जाहीर सभेत धानोरकर परिवाराचा निषेध*

12

भद्रावती नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार अनिल धानोरकर,

वरोरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवार मायाताई राजूरकर, तसेच भद्रावती व वरोरा येथील सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘जाहीर सभा’ आज (दि.२९) ला पार पडली. या सभेदरम्यान एका कुटुंबातील सदस्यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या विरोधात फलक दर्शवून निदर्शने केली.

या सभेस राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज भैया अहीर, वरोरा विधानसभेचे आमदार करण देवतळे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व भद्रावती निवडणूक प्रभारी रवींद्र शिंदे, उद्योजक रमेश राजूरकर, अशोक जिवतोडे, तसेच भाजपाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

सविस्तर असे की, या सभेत परमेश्वर मेश्राम या दलित कुटुंबातील सदस्यांनी हातात फलक घेऊन निदर्शने केली. भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल धानोरकर यांनी परमेश्वर मेश्राम या दलित कुटुंबाची शेती हडपल्याने त्यांना तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्त्या करावी लागली होती. त्यामुळे त्यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी या कुटुंबाची आहे. अनेक महिने लोटून देखील न्याय न मिळाल्याने मुख्यमंत्री शहरात आल्याचे औचित्य साधत मेश्राम कुटुंबीयांनी जाहीर सभेत आमची जमीन हडपणाऱ्या धानोरकर परिवाराचा निषेध, माझ्या वडिलांना आत्महत्या करायला लावणाऱ्या व जमीन हडपणाऱ्या अनिल धानोरकर यांचेवर गुन्हे दाखल करा, असे लिहिलेले फलक दाखवून निदर्शने केली.

या घटनेनंतर मुख्यमंत्री काय भूमिका घेतात व प्रशासन दखल घेईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.