The Voice
Home ताज्या बातम्या वादग्रस्त तहसीलदार भंडारकर यांच्या कार्यशैलीवरून पुन्हा नाराजी.

वादग्रस्त तहसीलदार भंडारकर यांच्या कार्यशैलीवरून पुन्हा नाराजी.

28

भद्रावती, दि. ०१ —

भद्रावती येथील तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या कार्यशैलीवरून पुन्हा एकदा नाराजीचा सूर उमटू लागला असून, स्थानिक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्यांच्या बदलीची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांकडे सामूहिक निवेदन सादर केल्याची माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी संबंधित तहसीलदारांवर कारवाई होऊन त्यांचे तात्पुरते निलंबन झाले होते. त्यानंतर ते पुन्हा भद्रावती येथेच रुजू झाल्याने त्यांच्या कार्यपद्धतीबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू होती.

पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कामकाजाच्या शैलीत अपेक्षित बदल दिसून न आल्याची तक्रार काही कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. विविध प्रकरणांमध्ये निर्णय प्रक्रियेला विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, त्याचा परिणाम कार्यालयातील कर्मचाऱ्यांवरही होत असल्याचे सांगितले जाते.

यासोबतच, काही प्रकरणांमध्ये कामे वेळेत पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांकडून कर्मचाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली जात असल्याची बाबही पुढे आली आहे. तसेच, कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण होत असल्याची भावना काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर, दिनांक ०१ एप्रिल २०२६ रोजी महसूल विभागातील विविध स्तरांवरील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना सामूहिक स्वाक्षरीचे निवेदन सादर करून तहसीलदारांच्या बदलीची मागणी केली आहे.

दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांची बदली न झाल्यास पुढील काळात आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही महसूल संघटनेतर्फे देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती महसूल मंत्री, पालकमंत्री तसेच इतर लोकप्रतिनिधींनाही पाठविण्यात आल्या आहेत.

या संपूर्ण प्रकरणावर जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.