चंद्रपूर :
२०१२ पासून राजकीय पक्षाच्या लोकशाही विरोधी भूमिकेमुळे माझ्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात माझी उमेदवारी असल्याचे रवि जोगी यांनी म्हटले आहे. या अन्यायाला जनता मतदानाच्या माध्यमातून उत्तर देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या की पक्षाचे निष्ठावान जुन्या कार्यकर्त्यांना डावलायचे आणि वेळेवर आयात झालेल्यांना AB फॉर्म देऊन निवडणुकीत उतरवायचे असा प्रकार गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीपासून स्थानिक वडगाव प्रभागात सुरु आहे. त्यामुळे पक्षाचे स्थानिक आमदार, पालकमंत्री असूनही दोन नगरसेवकांच्या पलीकडे भारतीय जनता पक्षाला वडगाव प्रभागात मजल मारता आली नाही. याही वेळेस तोच प्रकार झाल्याने भारतीय जनता पक्षाचे मागील २५ वर्षांपासून सक्रिय कार्यकर्ते असलेले व सिव्हिल प्रभागाचे मंडळ अध्यक्ष असलेले रवि जोगी यांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अपक्ष उमेदवारी ठेवण्याचा निर्णय घेतला.
रवि जोगी हे वडगाव प्रभागातील रहिवासी आहेत. गेल्या अडीच दशकांपासून ते भारतीय जनता पक्षात सक्रिय कार्यकर्ता आहेत. विद्यार्थी दशेत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करीत त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. माजी केंद्रित मंत्री हंसराज अहिर यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांना ओळखतात.
वडगाव प्रभागातून २०१२ मधे जेव्हा पहिल्यांदा महानगरपालिकेत नगरसेवक पदासाठी निवडणूक लढण्याची संधी रवि जोगी यांना मिळाली तेव्हा शिवसेनेतून भाजपात आयात झालेले देवानंद वाढई यांना तिकीट देण्यात आले. रवि जोगी यांना थांबण्यास सांगितल्या गेले. त्यावेळी स्थानिक आमदार नाना शामकुळे होते. त्यानंतर २०१७ मध्ये पुन्हा एकदा रवि जोगी यांना संधी आली तेव्हा नाना शामकुळे यांनी त्यांचे निकटवर्तीय रवि झाडे यांना तिकीट दिली. त्याही वेळेस रवि जोगी यांच्यावर अन्याय झाला. आता यावेळी २०२५-२६ मधे रवि जोगी यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता होती. मात्र याहीवेळेस रवि जोगी यांच्यासह भाजपचे माजी नगरसेवक तथा सुधीर मुनगंटीवार यांचे निकटवर्तीय राहुल पावडे यांचे स्विय सहाय्यक सत्यम गाणार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या गटातील सोहम बुटले यांना AB फॉर्म देऊन उमेदवारीत गोंधळ घालण्यात आला. या गोंधळात सत्यम गाणार अधिकृत ठरले तर रवि जोगी व सोहम बुटले यांना अपक्ष व्हावे लागले. याहीवेळेस रवि जोगी यांच्यावर अन्याय झाला, असे त्यांनी बोलून दाखविले.
तीन-तीनदा अन्याय होवून देखील रवि जोगी यांनी का म्हणून प्रत्येक वेळेस थांबायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा झाला. पक्षासाठी दिवसरात्र काम करुन त्याची पावती अशा प्रकारे मिळत असेल तर एखाद्याने काय करावे? सामान्य घरातील युवकांनी पक्षात काम करुन कुचंबणाच सहन करत राहायची काय? सामान्य घरातील युवकांनी राजकीय क्षेत्रात मोठे होऊच नये काय? असा प्रश्न रवि जोगी यांच्यासमोर उभा झाला आणि त्यांनी अपक्ष राहण्याचा निर्णय घेतला, वडगाव प्रभागातील नागरिकांनीही जोगी यांना यावेळी थांबू नका, लढा असा सल्ला दिला, त्यामुळेही जोगी यांचा निर्धार पक्का झाल्याचे, जोगी यांनी सांगितले.
आता जनतेनी या सर्व प्रकाराचा विचार करावा, व अन्यायाविरोधात माझा आवाज बुलंद करावा, अन्याय करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवावी, असे रवि जोगी यांनी बोलून दाखविले आहे.
————————————-
प्रभागात अनेक जण अपक्ष आहेत. काँग्रेसने जनविकास सेना पक्षासोबत वडगाव प्रभागात युती केली आहे, त्यांचे तीन नगरसेवक देखील एकप्रकारे अपक्ष आहेत. त्यांच्याकडेही राजकीय पक्षाचे चिन्ह नाही. त्यामुळे चिन्ह महत्वाचे नसून व्यक्ती व त्याचे काम महत्वाचे असे रवि जोगी यांनी अपक्ष उमेदवारीच्या प्रश्नावर बोलताना मत मांडले.
————————————-









