*ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात युवक व्यसनाच्या आहारी*

21

भद्रावती :

नुकतीच भद्रावती तालुक्यात दारू सोडण्याचे औषध घेवून दोन युवक मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. या अगोदरही अशा काही घटना वरोरा व भद्रावती या दोन्ही तालुक्यात घडल्याचे उदाहरण आहे. दारू सोडविण्याचे औषध घेवून गंभीर आजारी झाल्याचे, मानसिक संतुलन बिघडल्याचे व काही प्रकरणी मृत्युमुखी पडल्याचे दाखले आहेत. यात विशेषत: अल्पवयीन युवक असल्याचे समोर आले. या घटनेतून दारू सोडविण्याचे औषध देणाऱ्या या भोंदू बाबाचे अवैज्ञानिक कृत्य तर समोर येतेच मात्र दुसऱ्या अंगाने बघितल्यास यात ग्रामीण भागातील अनेक अल्पवयीन युवक व नागरीक दारूच्या व्यसनात गुरफटले असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.

अनेक गावात गुरुदेव सेवा मंडळ कार्यरत आहेत. सामुदायिक प्रार्थना होतात. गावागावात विविध संत महात्म्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या होतात. भजन व कीर्तन मंडळे आहेत. विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम होत असतात. सामाजिक संस्था कार्य करीत असतात. एव्हढे सर्व आध्यात्मिक, सामाजिक सद्विचारांवर कार्यक्रम सातत्याने होवून देखील व्यसन काही सुटत नसल्याची वास्तविकता ग्रामीण भागात आहे.

यास कारणीभूत ग्रामीण भागात होत असलेली दारू तस्करी आहे. व्यसनाच्या आहारी गेलेले हे युवक व नागरीक खूप महागडी दारू पीत नाही तर स्वस्त तथा देशी दारूचे सेवन अधिक करतात. ग्रामीण भागात देशी दारू भट्टी नाही. मग ग्रामीण भागात देशी दारू येते कुठून याचा शोध घेतल्यास तालुका स्तरावरून ग्रामीण भागात देशी दारूचा पुरवठा होत असल्याचे आढळून येत आहे.

माहितीनुसार तालुका स्तरावरून काही देशी दारूच्या दुकानातून अवैधरीत्या खेडोपाडी दारू तस्करी सुरू असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. भद्रावती शहरातून ग्रामीण भागात दारू तस्करी साठी काही मुले ठेवण्यात आलेली आहेत. ही मुले रात्रीबेरात्री दारूच्या पेट्या ग्रामीण भागात पोहचवितात. मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारू ग्रामीण परिसरात युवकांपर्यंत पोहोचवून त्यांना या व्यसनाच्या विळख्यात गुंतवित आहे. एकदा दारूची लत लागली की ते नियमितपणे दारूचे सेवन करतात. यातूनच अनेक अल्पवयीन युवक व नागरीक दारूच्या आहारी जावून असल्याचे दिसून येते.

ग्रामीण रस्त्यावरून भरधाव वेगाने दारूच्या पेट्या घेवून वाहतूक सुरू असते. या वाहतुकीने किरकोळ अपघात झाल्याच्या घटना या अगोदर घडल्या आहेत. दारू तस्करी करणारे गुंड प्रवृत्तीचे असल्याने भांडणाच्या भीतीने कुणी या तस्करांच्या तोंडी लागत नाही.

भद्रावती शहरात बस स्थानक समोर नागपूर रोड बाजूला परवाना धारक देशी दारू दुकान आहे. या दुकानातून अन्ना नामक व्यक्ती दारूच्या पेट्या ग्रामीण भागात सर्रास पोहचवितो. दारूबंदी काळात देखील हाच तालुक्यात अवैधरीत्या दारूची विक्री करायचा. पोलीस प्रशासनाने अनेकदा याच्या विरोधात कायदेशीर कारवाही केलेली आहे. पोलीस स्टेशन अंतर्गत याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे याच्या माध्यमातून होणारी दारू तस्करी थांबविण्याचे आव्हान पोलीस प्रशासनावर आहे.

सोबतच ग्रामीण भागातील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते तथा जनतेनी एक होवून अशा दारू तस्करी करणाऱ्या दुकाना विरोधात आवाज उठवावा व ग्रामीण भागातील युवक तथा नागरीक जे दारूच्या आहारी जात आहे, त्यांना व्यसनापासून परावृत्त करावे, अशी अपेक्षा आहे.