भद्रावती- भद्रावती नगरपालिका मागील काही वर्षात स्वच्छतेत व कचरा व्यवस्थापनेत अव्वल आली असल्याचे वृत्त आपण ऐकले आहे. जेव्हा स्वच्छता सर्वेक्षण केले जाते तेव्हा शहर सजवायचे व पुरस्कार मिळाल्यानंतर ये रे माझ्या मागल्या हेच प्रकार या शहरात अनुभावावयास मिळाले आहे.
नगर पालिका बरखास्त झाल्या नंतर शहरातील सर्व सूत्र प्रशाशक म्हणून नेमण्यात आलेल्या मुख्याधिकारी यांच्या कडे आहे परंतु सर्वच क्षेत्रांत त्या अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे. केवळ स्वच्छतेच्या बाबतीत जरी विचार केला तर शहर कचराकुंडी बनल्यागत चित्र आहे. वरोरा मार्गे शहरात प्रवेश केल्यास सर्वात आधी घाणीचा सामना करावा लागतो ठीक ठिकाणी विविध प्रकारच्या घाणीचे ढिगारे रस्त्याच्या दोन्ही बाजूस बघावयास मिळते. बँक ऑफ इंडिया जवळ येताच कमालीच्या दुर्गंधी चा सामना नागरिकांना करावा लागतो तिथेच माजी नागराध्यक्ष्य यांचे प्रतिष्ठान आहे जरा पुढे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात शहरातील नामांकित चिकन सेंटरचा वास व त्यात भर घालण्या करिता न.प.चे मुत्रीघर आहे. संपूर्ण भारतात सुप्रसिद्ध असलेले जैन मंदिराकडे जाणार्या प्रवेश द्वारालगतच नागरिक दिवसभर मुत्रविसर्जन करीत असतात तिथून जाताना बाहेरून येणार्यांना व शहरातील नागरिकांना जो त्रास सहन करावा लागतो तो येथील स्वच्छतेची कहाणी सांगून जातो. नाग मंदिर चौकात या शहरावर प्रेम करणारे फलक लावण्यात आले आहे त्या फलाकापुढेच कमालीची घाण साचलेली आहे. शहरातील दोन्ही स्मशानभूमी कडे जातांना सुद्धा प्रचंड घानिचा सामना करत अंतिम यात्रेला मार्ग काढावा लागतो. शहरातील एकमेव भाजीमंडीत प्रवेश करताच सर्वात आधी घाणीला सामोरे जावे लागते. चंद्रपूर कडे जाण्याकरिता बनविण्यात आलेल्या ऐतिहासिक उड्डाणपुलाच्या बाजूस देखील आजूबाजूचे चीकन व्यासायीक व हॉटेल व्यवसायिकांनी टाकलेल्या घाणीमुळे नागरिकांचे जगणे दुभर झाले आहे. शहरातील रिकाम्या प्लॉटवर वाढलेलं जंगल आजुबाजूच्या नागरिकांना धोकादायक ठरत आहे. नाल्या तुडुंब भरून वाहत आहेत ज्या नाल्या उपसल्या जात आहेत त्यातील गाळ तसाच जाग्यावर आहे.नाल्यांवर बांधण्यात आलेली टक्केवारीची खुली गटारे अपघातास आमंत्रण देत आहेत.
एकंदरीत शहराचे चित्र विदारक झाले आहे. लोक समस्या घेऊन नगरसेवकांपर्यंत जात आहेत परंतु त्यांचा कार्यकाल साम्पुस्ठात आल्याने ते हि हात वर करत आहेत. वरील संपूर्ण समस्यांची जबाबदारी इथे नेमण्यात आलेल्या प्रशासकाची आहे परंतु अकार्यक्षमते मुळे शहरात समस्यांचा डोंगर मोठा होत चालला आहे. या सर्व समस्या सोडविण्या करिता त्वरीत कार्यक्षम अधिकारी नेमण्याची मागणी शहरातील विविध क्षेत्रातून केली जात आहे.