भद्रावती नगरपालिकेतील भ्रष्टाचार व टक्केवारी वरून वातावरण तापले

115

*भद्रावती नगरपालिकेतील भ्रष्टाचार व टक्केवारी वरून वातावरण तापले*

*माजी नगरसेवकाने केला व्हिडीओ वायरल तर विद्यमान नगरसेवकाने चढविला हल्ला*

भद्रावती :

स्थानिक नगरपालिकेतील भ्रष्टाचार व टक्केवारी वरून सध्या शहरातील वातावरण तापले आहे. सत्ताधारी पक्षाच्या एका विद्यमान नगरसेवकाने माजी नगरसेवकाला बोलत असताना पालिकेत सुरू असलेला भ्रष्टाचार, टक्केवारी तथा विद्यमान नगरसेवक करीत असलेल्या ठेकेदारी विषयी सखोल माहिती दिली. यावेळी विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक व एका नगरसेविकेचे पती उपस्थित होते. सदर माहिती सांगताना माजी नगरसेवकाने मोबाईल मधे रेकॉर्डींग करून ठेवले व ते सोशल मीडिया वर पोस्ट केले. यातून शहरातील जनतेला खुद्द विद्यमान नगरसेवक जो यापूर्वी बांधकाम सभापती व विविध स्थायी समित्यांवर कार्यरत होता, त्याने सांगितलेला पालिकेतील भ्रष्टाचार व नगरसेवकांच्या ठेकेदारीचे किस्से नावासकट ऐकायला मिळाले. अर्थातच ही बाब नगराध्यक्ष व सत्ताधारी पक्षाचे नेते यांना आवडली नाही व त्यांनी त्या विद्यमान नगरसेवकाला बोलावून झापले. इकडे दिवसभर व्हिडिओखाली सोशल मीडियावर कॉमेंट्स चा पाऊस सुरू होता. शहरात टक्केवारी भ्रष्टाचार व नगरसेवकांची ठेकेदारी ही एकच चर्चा रंगली. या घटनेमुळे विद्यमान नगरसेवक चिडला व त्याने रात्री उशीरा पत्नी, भाचा व पाच-सात जणांना घेवून माजी नगरसेवकाच्या घरावर हल्ला चढविला. अर्वाच्च शिवीगाळ व मारण्याची धमकी दिली. या सर्व प्रकाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होत राहिले. त्यानंतर त्या माजी नगरसेवकाने शहरातील काही राजकीय मंडळींना सोबत घेवून स्थानिक पोलीस स्टेशन मधे जावून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी विद्यमान नगरसेवकावर कलम ५०४ व ५०६ अंतर्गत तक्रार दाखल करून घेतली.

दरम्यान त्या विद्यमान नगरसेवकाने माजी नगरसेवकावर सदर व्हिडिओ अपलोड न करण्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी करून ब्लॅकमेल केल्याचा देखील आरोप केला आहे. मात्र विद्यमान नगरसेवकाने पालिकेची पोलखोल केली हे व्हिडिओ मधे स्पष्ट दिसते.

भद्रावती नगरपालिका ही स्थापनेपासूनच शिवसेनेच्या अधिपत्याखाली आहे. मागील तीन टर्म पासून एकहाती सत्ता आहे. पालिकेतील कमिशनखोरी व भ्रष्टाचाराबाबत या अगोदर अनेकदा आजी-माजी नगरसेवकांनी प्रश्न उठविले आहेत. मात्र सत्ताधारी पक्ष त्यांच्या ताकदीच्या भरोशावर ते सर्व आरोप दाबून टाकण्यात यशस्वी झाले. पालिकेच्या भोंगळ कारभाराबाबत एक जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रविष्ठ आहे. येथे विरोधी पक्ष मजबूत नसल्याने सत्ताधाऱ्यांचे फावत आले आहे. मात्र खुद्द विद्यमान नगरसेवकच जेव्हा येथील भ्रष्टाचाराबाबत सविस्तर सांगत असल्याने जनतेला आयता पुरावाच मिळाला आहे.

स्थानिक जनता यासर्व प्रकाराकडे कोणत्या नजरेतून पाहते, पुढे हे प्रकरण काय रंग भरते व पोलीस प्रशासन तथा नगरविकास मंत्रालय या सर्व प्रकरणाचा तपास करून काय कार्यवाही करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.