पोलिस तपासयंत्रणेवर पूर्ण विश्वास, वेळ लागेल पण सत्य जरूर बाहेर येईल : संतोष रावत

96

चंद्रपूर :

दिनांक ११ मे रोजी मुल येथे गोळीबार करून मला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना पोलिस विभागाने अटक केली त्यासाठी सर्वप्रथम पोलीस विभागाचे अभिनंदन. पोलिस तपासयंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. वेळ लागेल मात्र एक दिवस सत्य जरूर बाहेर येईल, याची मला खात्री आहे, असे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा जेष्ठ काँग्रेस पदाधिकारी संतोष रावत म्हणाले.

पुढे बोलतांना रावत म्हणाले की, काही मुलांना वेकोलित नोकरी लावून देतो म्हणून सहा लाख रुपये घेतले होते. मात्र, नोकरी लावून दिली नाही. पैसेही परत करीत नसल्याने हा हल्ला केल्याचे आरोपींनी सांगितल्याचे कळते आहे. मात्र या दोन्ही बाबी सपशेल चुकीच्या आहेत. एकतर मी आरोपींना ओळखत नाही. व माझा वेकोलिशी काही एक संबंध नाही.

मी काँग्रेस पक्षाचा जुना कार्यकर्ता व पदाधिकारी आहे. आरोपी हे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत तथा पक्षीय सहसंबंधाने एखाद्या कार्यक्रमात जाणता अजाणता संपर्क येन्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र तो संबंध हा तेव्हढ्या पक्षीय कार्यक्रमापुरताच आहे. माझे व्यवसाय, माझे काम करण्याचे क्षेत्र हे वेगळे आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वेकोली कार्यक्षेत्राशी माझा काहीही संबंध येत नाही. त्यामुळे आरोपी कडून सांगण्यात येत असल्याचे कारण हे दिशाभूल करणारे व चुकीचे आहे.

जर माझे आरोपी सोबत संबंध असेल तर ते कॉल डीटेल्स, भेटीगाठीचे सीसीटीवी फुटेज, कार्यक्रमातील फोटो, बघनाऱ्यांचे बयान आदींवरून सिध्द होवू शकते. पण जे आहेच नाही ते सिध्द तरी कसे होईल?

गेल्या काही दशकात मी स्थानिक स्वराज्य संस्था व सहकार क्षेत्रात विविध पदे भूषवित पक्षात चांगली कामे करीत आलो आहे. सुरवातीला मुल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद, मुल नगरपालिकेचे नगराध्यक्षपद, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद व आता जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भूषवित आहो. मी या पदांच्या माध्यमातून त्या-त्या क्षेत्रात विकासात्मक कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत अध्यक्ष पदावर रुजू झालो तेव्हा बँकेची आर्थिक घडी खस्ता झालेली होती. त्या परिस्थितीतून या शेतकऱ्यांच्या बँकेला सावरण्याचे व आर्थिक उच्चांकापर्यंत नेण्याचे कार्य मी केले, हे सर्वश्रुत आहे. दरम्यान जिल्हा बँकेत अपुऱ्या मनुष्यबळामुळे नोकर भरतीची प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न केला. मात्र बँकेला बाह्य राजकारण्यांनी बदनाम करण्याचे व नोकर भरती थांबविण्याचे पुरजोर प्रयत्न केवळ राजकीय आकसापोटी केले.

माझ्या पक्षीय व राजकीय जीवनाचा उत्कर्ष बघविल्या न जाणाऱ्या आकसी प्रवृत्तीच्या लोकांनी हे कृत्य केले आहे. जिल्हा बँकेवर करडी नजर असलेल्यांचे देखील हे कृत्य असू शकते. त्यामुळे आरोपी हे प्यादे आहेत, या सर्व घटनांचा मास्टर माईंड हा कुणी दुसराच आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक शंकासूत्रे पुढे आली आहेत. कोणत्या लोकप्रतिनिधींचे नातेवाईक वेकोलीच्या बदल्या, खाजगी कोळसा खाणी व या कोळणा खाणी मध्ये तथा लहान मोठ्या कंपन्यात नोकरी लावुन देण्यासाठी ५०००० रुपये ते १००००० रुपये पर्यंत पैसे घेणे, त्यांचे पगारातुन ही हिस्सा ठेवणे असे काम करणारे लोकप्रतिनिधी उदयास आले, तेव्हा पासुन जिल्हयातील नामवंत ट्रान्सपोर्टरला हाताशी धरुन कामे देने व कर्नाटक पावर ला दर्जेदार कोळसा रेल्वे साईडीग वर भेसळ करुन पाठविणे, रेल्वे रॅकच्या रॅक कोळसा बाजारात विकणे, माईनिंग मधुन ट्रकच्या ट्रक कोळसा खुल्या बाजारात विकणे, यासाठी गुंडगिरीचे लोक हाताखाली ठेवने, अवैद्य दारु व्यवसाय यातुनच अमाप पैसा कमवुन जनतेला अमिरी दाखविले यावरुन स्पष्ट होते की स्वतःचे पाप दुसऱ्यांच्या नावावर फोडणे, या सर्व गैरप्रकारातील लवकरच या मागील मुख्यसुत्रधार पुढे येईल व जनतेला सुध्दा माहीत होईल.

या दिशेने तपास होणे गरजेचे आहे. या शांतप्रिय जिल्ह्यात माझ्या एकट्यावरच सदर हल्ला झाला, असे नाही. यापूर्वी देखील अनेक हल्ले राजकीय, सामाजिक तथा पत्रकारिता क्षेत्रातील लोकांवर झालेले आहेत. त्यामुळे तपासाची दिशा त्या अनुषंगाने ठरवून आरोपींकडून सत्य बाहेर काढल्यास जिल्ह्यातील जंगलराजचा खरा चेहरा समोर येवू शकतो.

यासाठी माझी व आरोपी दोघांचीही नार्को टेस्ट करावी, जे सत्य आहे ते या नार्को टेस्टने समोर येईल. हे करणे यासाठी देखील गरजेचे आहे की या जिल्ह्यातील शांतता नेमकी कोण भंग करीत आहे व हल्लेखोरी करून दहशत निर्माण करून नेमके कोण राजकीय वर्चस्व गाजवू इच्छित आहे, हे या टेस्टने जनतेसमोर येईल.

सत्य परेशान होईल पण पराजित होणार नाही, एक दिवस या जंगलराज राजकीय माफियांचा खरा चेहरा जनतेसमोर नक्की येईल, यावर माझा ठाम विश्वास आहे, असे रावत म्हणाले.