ओबीसी बचाव परिषद” येत्या १७ डिसेंबरला चंद्रपुरात : डॉ. अशोक जीवतोडे

33

*नागपूर :*

विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्रातील ओबीसी समाजातील विविध जातसमुदायाच्या प्रतिनिधींची ‘ओबीसी बचाव परीषद’ १७ डिसेंबरला चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर सकाळी ११ वाजता होणार आहे.

सध्या राज्यात मराठा आरक्षण या विषयावर जे वातावरण सुरू आहे, या पार्श्वभूमीवर ओबीसी समाज पेटून उठला आहे. देशाच्या स्वातंत्र्यापासून आजतागायत घटनादत्त ओबीसी समाजाचे अधिकार व हक्क प्रलंबित आहेत. ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात ओबीसी समाज व संघटना सातत्यपूर्ण लढा देत असूनही सध्या राज्यात सुरु असलेले वातावरण ओबीसी समाजाला डीवचण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यानुसार ओबिसीतील सर्व जातसमूहाने एकत्र येवून ओबीसींच्या सर्वंकष मागण्यांवर विचारमंथन करण्यात येणार आहे. याकरीता समाजातील जात संघटनांची मूठ बांधून ओबीसी संगठन आणखी मजबूत करणे, या उद्देशाने विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या सहभागातून ओबीसी समाजातील समस्त जात, उपजात समूह संघटना, ओबीसी संघटना मिळून “ओबीसी बचाव परीषद” च्या माध्यमातून सद्यपरिस्थितीवर मंथन करण्यात येणार आहे. त्यानुसार ओबीसी समाजातील जातसंघटनेच्या चर्चेअंती संमत होणारे ठराव राज्य सरकारला व केंद्र सरकारला हिवाळी अधिवेशन दरम्यान देण्यात येणार आहे.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांची आरक्षणाबाबतची भूमिका वारंवार बदलत असताना दिसून येत आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या व ओबिसीतून मराठा समाजाला आरक्षण द्या, ही त्यांची मागणी ओबीसी समाजाचे नुकसान करणारी आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून तर आजतागायत मराठा समाजाला राज्यात मिळालेल्या प्रतिनिधीत्वानंतरही आत्मचिंतन करण्याचे सोडून समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचे कार्य ते करीत आहेत. त्यांचे वक्तृत्व हे द्वेष व विरोध पसरविणारे आहे. ओबीसी नेते व राज्य सरकार विरोधात ते जे बोलतात त्या मागण्या या संविधानविरोधी आहेत. जो ओबीसी समाज नेहमी मराठा समाजासोबत राहिला आहे, त्याच ओबीसी समाजाच्या पाठीत खंजर खुपसण्याचा प्रयत्न जरांगे यांचा दिसतो आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला सतर्क व्हावे लागत आहे. ओबीसी समाजातील समस्त जातसमुदायाची ताकद व एकता दाखविण्याची ही वेळ आहे. त्यासाठीच ‘ओबीसी बचाव परीषद’ आयोजित करण्यात आलेली आहे. या परिषदेच्या माध्यमातून राज्य व केंद्र सरकारला ओबीसी समाजाच्या मागण्यांचे ठराव पाठविण्यात येईल.

यानिमित्ताने ओबीसी समाजातील सर्व जातसमुदायाने एकत्र येवून आपली एकता व ताकद संपूर्ण देशाला दाखवावी, असे आवाहन विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले आहे.