भद्रावती पोलीस स्टेशन च्या रस्त्यावर भंगार व्यावसायिकांचे अतिक्रमण

49

भद्रावती :

जुना बसस्थानक ते नागपूर चंद्रपूर महामार्ग या दरम्यान भद्रावती पोलीस स्टेशन आहे. शहरातून या पोलीस स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यावर भंगार व्यवसाय चालतो. या भंगार व्यावसायिकांनी अतिक्रमण करून भंगार साहित्य रस्त्यावर पसरवून ठेवले आहे. त्यामुळे रस्त्याची रहदारी बाधित होत आहे. येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यास त्रास सहन करावा लागत आहे.

जुना बसस्थानक ते चंद्रपूर नागपूर महामार्ग या रस्त्यावर चंडिका मंदिर, पोलीस स्टेशन, महावितरण कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, श्रीराम नगर व इतर रहिवासी परिसर येतो. प्रामुख्याने शासकीय कार्यालय असलेला हा रस्ता आहे, या रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येकालाच या अतिक्रमणाचा त्रास होतो आहे. मात्र झगड्याच्या भीतीने कुणीही समोर येवून विरोध दर्शवायला तयार नाही. याचाच फायदा घेवून हे भंगार व्यावसायिक रस्त्यावर स्वतःची मालकी असल्यागत वागतात व भंगार साहित्य रस्त्यावर ठेवतात. या समस्येकडे पोलीस विभाग लक्ष देईल का व भंगार व्यावसायिकांवर कारवाई करतील का, हा प्रश्न नागरीक विचारत आहे.

शहरात अनेक तुरळक चोरीच्या घटना घडतात. हा चोरीचा माल भंगार व्यावसायिकांना विकल्या जातो. भंगार विकत घेत असताना भंगार व्यावसायिकांना काही नियमावली लावून देणे आवश्यक आहे. सोबतच भंगार खरेदी विक्री वर अंकुश लावून देणे आवश्यक आहे, ज्यामुळे शहरातील चोरीच्या घटनांवर आळा घालता येईल, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.