जिल्हा बँकेच्या मेंडकी शाखेत १७ लाखांची अफरातफर

35

चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मेंडकी शाखेत १७ लाख ६७ हजार ३१५ रूपयांची अफरातफर झाली. यामध्ये बडतर्फे कर्मचारी अमित राऊत याने ३ लाख ८९ हजाराची अफरातफर केली आहे. याच अफरातफर प्रकरणात बँक कर्मचारी रवींद्र भोयर, कल्पना मसराम, ए.पी. नागपुरे, एस.बी. शेंडे यांच्यावरही बडतर्फीची कारवाई केली होती. या सर्वांविरुध्द ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात अफरातफरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांना अटक देखील केली होती अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी दिली.

बँकेच्या वतीने अध्यक्ष संतोष रावत यांनी येथे प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, १८ ऑगस्ट २०१८ रोजी बालाजी उरकुडे यांनी अफरातफरीची तक्रार बँकेच्या कार्यालयात केली. या तक्रारीच्या आधारावर चौकशी करण्यात आली. त्यात १७ लाख ६७ हजार ३१५ रूपयांची अफरातफर झाल्याचे समोर आले. लेखापरिक्षणातही ही अफरातफर समोर आली. त्यानंतर लेखापरीक्षक साजन साखरे यांनी ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली.

या तक्रारीच्या आधारावर बँक कर्मचारी अमित राऊत, रवींद्र भोयर, कल्पना मसराम, ए.पी. नागपुरे, एस.बी. शेंडे यांच्याविरूध्द गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. याप्रकरणी अमित राऊत यांनी न्यायालयात जमीनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने अर्ज खारीज केला. अमित राऊत याला २१ सप्टेंबर २०२० मध्ये अटक झाली.

पोलीस व न्यायालयीन कोठडीनंतर १२ नोव्हेंबर २०२० रोजी न्यायदंडाधिकारी यांनी जमानतीवर सुटका केली. दिड महिन्यापेक्षा अधिक काळ कोठडीत राहिल्याने बँकेच्या नियमानुसार राऊत याला निलंबित केले. राऊत यांची सहकारी अधिकारी शिरभये यांनी विभागीय चौकशी केली. यातही तो दोषी आढळला. त्यानंतर बँकेच्या संचालक मंडळाने ३० जून २०२१ मध्ये राऊत याला बडतर्फ केले. त्यानंतर राऊत यांनी कामगार न्यायालयात धाव घेतली. मात्र तिथेही राऊत यांच्यावरील कारवाई नैसर्गिक न्यायतत्वानुसार झाल्याचा निवाडा दिला आहे. बँकेत केलेल्या अनियमिततेमुळेच राऊत यांच्यावर कारवाई केल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी दिली.