भद्रावती तालुक्यातील कर्नाटक एम्टा कोळसा खाणीत नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचे आंदोलन

32

भद्रावती :

नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समोरच त्यांच्या कार्यकर्त्यांनी खासगी कोळसा खाणीच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याचा गंभीर प्रकार आज (दि.१९) ला येथे घडला आहे. विशेष म्हणजे शिवीगाळ करण्यात खासदार धानोरकर यांचे सख्खे भाऊ प्रवीण काकडे व काही पक्षाचे पदाधिकारी आघाडीवर होते. निवडून येताच खासदाराच्या भावाने हा पराक्रम केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. या घटनेचा व्हीडिओ आता सोशल मीडिया वर समोर आल्याने खासदार धानोरकर यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात बरांज मोकासा येथे कर्नाटक एम्टा ही खाजगी कोळसा खाण आहे. ही खाण कर्नाटक सरकारची आहे. या खाणीला येथे सुरू होवून वीस वर्षे झाली आहे. या दरम्यान या क्षेत्राचे आमदार व खासदार धानोरकर दाम्पत्यच राहिले आहे. इतक्या वर्षात या कोळसा खाणीशी निगडित अनेक समस्या निकाली काढण्यास हे दांपत्य अयशस्वी राहिले आहे. व आता आंदोलनाचा फार्स करून गुंडशाही व अश्लील शिवीगाळी करून परिसरातील वातावरण खराब करण्याचे काम खासदार यांच्या डोळ्यादेखत त्यांचा भाऊ व काही पदाधिकारी तथा कार्यकर्ते करीत आहेत.

या खाणीतील कोळसा वाहतुकीमुळे पिकांना मोठा फटका बसू लागला आहे. सोबतच प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व अधिग्रहण संबंधित प्रश्न आहेत. या प्रश्नांना घेवून खासदार प्रतिभा धानोरकर व्यवस्थापनासोबत चर्चा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत भाऊ प्रवीण काकडे आणि असंख्य कार्यकर्ते व प्रकल्पग्रस्त होते. अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच प्रवीण काकडे यांनी अधिकाऱ्याला विचारपूस करता करता शिवीगाळ केली आणि त्याचवेळी एका व्यक्तीने त्या अधिकाऱ्यांना थापड लगावली. यानंतर एकच गोंधळ उडाला. पाठोपाठ इतर पदाधिकारींनी अधिकाऱ्याला मारायला सुरुवात केली. के.पी.सी.एल. इंटींग्रटेड बरांज ओपनकास्ट कोल माईन्सचे चीफ इंजिनियर शिवप्रसाद असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे. नंतर अधिकाऱ्यांना सर्वांनी शिवीगाळ करणे सुरू केले. उपस्थित पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्याला फार यश आले नाही. अधिकाऱ्यांना कसेबसे बाहेर काढण्यात आले. अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची, मागण्या ठेवण्याची एक पद्धत असते, शिष्टाचार असतो, पण यावेळी तो पाळण्यात आला नाही. खुद्द खासदारांच्या सख्ख्या भावानेच शिवीगाळ करायला सुरुवात केल्याने निकाल लागताच मुजोरी आल्याची चर्चा रंगू लागली आहे. अजून नवनिर्वाचित खासदार मॅडमचा शपथविधी व्हायचा आहे.

दरम्यान, यासंदर्भात कर्नाटक एम्टा खाण व्यवस्थापनाचे उपाध्यक्ष जीभकाटे यांनी, यावर बोलण्यास नकार दिला. असे काही घडले नाही, असे ते म्हणाले.

पोलीस प्रशासन कारवाई करणार का?

खासदार धानोरकर यांचे भाऊ तथा पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कर्नाटक एम्टा कोळसा खाण कंपनी च्या अधिकाऱ्यांना मारहाण केली त्यांच्यावर पोलीस प्रशासन कारवाई करतील का? पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यास सक्षम आहे का? हा प्रश्न आता सामान्य नागरीक विचारत आहे.