कृषी केंद्रातून घेतलेल्या तणनाशक फवारणीने अडीच एकरातील पराटी भाजली

29

वरोरा :

तालुक्यातील वडगाव येथील एका शेतकऱ्याने शहरातील एका कृषी केंद्रातून कपासी पिकातील कचरा मारण्याकरिता तणनाशक घेतले. सदर तणनाशकाची फवारणी कपासी पिकात केली. त्यानंतर काही दिवसातच संपूर्ण शेतातील कपास पीक जळून गेले. याबाबत संबंधित कृषी केंद्र चालक व तालुका कृषी अधिकारी यांना शेतकऱ्याने कळविले, मात्र त्यांनी कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वरोरा तालुका अध्यक्ष दत्ता बोरेकर यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची आज (दि.२३) ला चंद्रपूर येथील कार्यालयात भेट घेतली व संबंधित कृषी केंद्र व तणनाशक औषधी कंपनीला सिल करून परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे. ताबडतोब संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई न दिल्यास व दोषींवर कारवाई न केल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करु असा इशारा निवेदनातून दिला आहे.

सविस्तर असे की, तालुक्यातील वडगाव येथील शेतकरी वसंता हरी गोचे यांनी दिनांक २ जुलै ला शहरातील अशोक कृषी केंद्र येथून तणनाशक विकत घेतले. ते दिनांक ३ जुलै ला संपूर्ण अडीच एकरातील कपाशीवर फवारले असता अडीच एकरातील संपूर्ण कपास भाजल्या गेले. यात शेतकऱ्याचे वर्षभराचे नुकसान झाले. दरवर्षी सरासरी २५ ते ३० क्विंटल कापूस व तुर संबंधित शेतकरी या शेतात घेतात. याबाबत शेतकऱ्याने वारंवार कृषी केंद्र चालक व तालुका कृषी अधिकारी यांना याबाबत तोंडी अथवा लेखी कळविले, मात्र कुणीच शेतकऱ्याच्या नुकसानीची दखल घेतली नाही. उलट उडवाउडवीची उत्तरे देत कृषी केंद्र चालकाकडून १० ते १५ हजार घेवून प्रकरण थांबवा अशा सूचना केल्या.

त्यामुळे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) तालुका अध्यक्ष दत्ता बोरेकर यांनी संबंधित कृषी केंद्र व तणनाशक औषध कंपनीला सिल करून परवाना रद्द करावा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करु, असा इशारा दिला आहे.

या निवेदनाच्या प्रतिलीपी मुख्यमंत्री, कृषी मंत्री, आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या आहे.