खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या भावाविरोधात गुन्हा दाखल

10

भद्रावती :

चंद्रपूरमधील नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर (MP Pratibha Dhanorkar) यांच्यासमोर त्यांच्या भावाने आणि कार्यकर्त्यांनी खासगी कोळसा खाणीच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. याप्रकरणी खासदार धानोरकर यांचे सख्खे भाऊ प्रवीण काकडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधीक्षक अभियंता एस. शिवप्रसाद जी. शिवण्णा, (वय ४९ वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीची दखल भद्रावती पोलिसांनी घेतली.
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात कर्नाटक एम्टा कोळसा खाण आहे. ही खाण कर्नाटक सरकारची आहे. या खाणीत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांना घेऊन खासदार प्रतिभा धानोरकर खाण व्यवस्थापनासोबत चर्चा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत भाऊ प्रवीण काकडे, कार्यकर्ते आणि प्रकल्पग्रस्त होते.

यावेळी बरांज कोल माईन्स प्रा.ली. कंपनीचे प्रशासन अधिकारी सुभाष गोहकर, राजेश वासाडे, गजानन जिभकाटे, अधीक्षक अभियंता एस. शिवप्रसाद जी. शिवण्णा आदी अधिकारी चंद्रपूर खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर यांच्याशी भेटीसाठी केपीसीएल, बरांज मोकासा येथे कंपनी कार्यालयात उपस्थित होते. सकाळी 11.00 च्या सुमारास खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर त्यांच्या कार्यकर्त्यांसह के.पी.सी.एल. कंपनीच्या ऑफिसच्या दिशेने आले. मग कार्यालयाशेजारील मोकळ्या जागेत झाडाच्या सावलीत बसून बैठक घेण्याचे ठरले आणि तिथेच बैठक सुरू झाली. कंपनीने केलेल्या कारवाईबाबत खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर बोलत असताना अचानक प्रवीण काकडे यांनी मला एक पेपर वाचायला दिला. गावाचे पुनर्वसन होईपर्यंत कंपनीचे काम सुरू करू नका, असे प्रवीण काकडे मला सांगत होते. मी म्हणालो की, पुनर्वसनाचे काम सुरू झाले आहे. त्यानंतर प्रवीण काकडे याने मला शिवीगाळ केली आणि मागे उभ्या असलेल्या व्यक्तीने उजव्या बाजूच्या गालावर जोरात चापट मारली. त्यामुळे उपस्थित असलेले 7-8 कामगार आक्रमक झाले. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्ती केली.

कर्नाटक पॉवर कंपनी लिमिटेड (KARNATAKA POWER COMPANY LIMITED) अधीक्षक अभियंता एस. शिवप्रसाद जी. शिवण्णा यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रवीण काकडे, नीलेश भालेराव आणि अन्य जणांविरोधात भारतीय दंड संहिता अधिनियम १८६० अंतर्गत कलम १४३, १४७, १४९, २९४, ३५३, ५०६, ३३२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.