भद्रावती :
लोकसभा निवडणुकी दरम्यान धानोरकर यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होत होता. त्यावेळी समाजापुढे धानोरकर यांनी बोलून दाखविले होते की यानंतर घरातच पदे न देता समाजातील इतर नेतृत्वाला संधी देवू. त्यानुसार वरोरा विधानसभेत आगामी निवडणुकीकरीता खासदार धानोरकर घरातील उमेदवार न देता समाजातील नेतृत्वाला संधी देतील अशी सर्वांना आशा आहे. त्यानुसार अनेक चेहरे सध्या निवडणूक रिंगणात येण्यास इच्छुक दिसत आहेत.
नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर विजयी झाल्या. प्रतिभा धानोरकर खासदार बनल्याने वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. वरोरा विधानसभा क्षेत्र आता आमदार रहित झाले आहे. त्या काँग्रेस पक्षाच्या असल्याने परिणामी वरोरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षात स्थानिक पातळीवर विधानसभेकरीता नविन नेतृत्वाची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या होत्या की विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मी ठरवणार, तिकीटा मी वाटणार, त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.
वरोरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाची विद्यमान आमदार होती, म्हणून आगामी विधानसभा क्षेत्रात वरोरा विधानसभा ही काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस कडून आगामी विधानसभेकरीता नविन नेतृत्वाची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेत अनेक नावे समोर आली आहेत.
एकीकडे खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या परिवारातील भद्रावती शहराचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, भाऊ प्रविण काकडे आहेत तर दुसरीकडे पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी तथा कार्यकर्ते आहेत. इच्छुकांमध्ये, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक राजु चिकटे, काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. हेमंत खापने, प्रकाश बाबू मुथा, काँग्रेसचे भद्रावती तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजने, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष दिनेश चोखारे, कुणबी समाजाचे जिल्हा अध्यक्ष एड. पुरुषोत्तम सातपुते, एड. महेश ठेंगणे, डॉ. चेतन खुटेमाटे, यांची नावे आहेत.
यात नेमकी बाजी कोण मारेल? परिवारातील उमेदवार की पक्षातील इतर उमेदवार? खासदार प्रतिभा धानोरकर समाजाला दिलेला त्यांचा शब्द पाळतील का?
आदी अनेक प्रश्नांच्या सध्यपरिस्थितीत खासदार प्रतिभा धानोरकर या नेमकी कुणाला संधी देतील, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.