भद्रावती :
पिरली ते सागरा, बिजोनी, शेगाव रस्त्यावर येणाऱ्या आठ गावातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा मार्ग बंद होण्याच्या वळणावर सदर रस्त्याची परिस्थिती येवून ठेपली आहे.
शाळा सुरु झाली तेव्हापासून म्हणजे मागील दोन महिन्यांपासून शाळकरी विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरु करण्यात आली होती. दरम्यान सदर रस्त्याची स्थिती खराब असल्याने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे रस्ता दुरुस्तीची मागणी गावकरी करीत होते. मात्र सदर रस्ता दुरुस्ती झाली नाही. त्यात भरीस भर गेल्या आठवडाभरापासून झालेल्या संततधार पावसामुळे रस्त्याला मोठमोठे भगदाळ पडले आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावरून बस जाणे अशक्य होत आहे. परिणामी या परिसरातील शंभर ते दीडशे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने पिरली ते सागरा, बिजोनी, शेगाव रस्त्यावर येणाऱ्या आठ गावातून जाणाऱ्या या रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता दुरुस्तीचे काम त्वरित हाती घ्यावे, सोबतच रस्त्याच्या कडेला वाढलेली बाभळीची झाडे तोडून टाकावी, ज्यामुळे बस सेवा सुरळीत राहील व परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. पण जर का रस्त्याची स्थिती अशीच राहिली व बस सेवा बंद झाली तर आम्ही पालकमंत्री व खासदार यांचे निवासस्थानासमोर आंदोलन करू, असा इशारा परिसरातील ग्रामवासियांनी दिला आहे.
यावेळी पिरली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. वर्षा विजय तरारे, माजी सरपंच विजय तरारे, यांनी खासदार, पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपिभाग उपविभागीय अभियंता यांना सदर विषयावर निवेदन दिले आहे.