भद्रावती शहरातील विद्यार्थी व तरुणांच्या आयुष्यात ड्रग्ज व गांजाचा शिरकाव,पालक चिंताग्रस्त

121

*सावधान ! भद्रावती शहरातील विद्यार्थी व तरुणांच्या आयुष्यात ड्रग्ज व गांजाचा शिरकाव*

*पालक चिंताग्रस्त; शाळा व पोलिस प्रशासनासमोर आव्हान*

*गांजा विक्री करतांना कलम ८(क), २०(ब) ii (अ) गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act) १९८५ अन्वये गुन्हा नोंद*

भद्रावती :

शहरातील शालेय विद्यार्थी ड्रग्ज, गांजा व व्हाईटनर मध्ये वापरण्यात येणारे थीनर या मादक पदार्थांचा नशा येण्याकरीता वापर करीत आहे. तरुण विद्यार्थी नशेच्या विळख्यात अडकलेले असून पालक व शाळा तथा पोलीस प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास आरोग्यासह त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे शाळेतील ८ वी ते १२ वी पर्यंतचे अनेक विद्यार्थी नशेच्या आहारी गेले आहेत.

भद्रावती शहरात नुकत्याच उघडकीस आलेल्या ड्रग्स व गांजा प्रकरणाने पालक, विद्यार्थी व सामान्य नागरिकांची झोप उडवली आहे. शहरातील एका प्रतिष्ठित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांच्या बॅग मधे चक्क ड्रग्स व गांजा आढळून आला. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. विद्यार्थी वर्गात मागच्या बाकावर बसून ड्रग्स व गांजा ओढतात. हा प्रकार शिक्षकांच्या लक्षात आला. संबंधित शाळेतील प्राचार्या व शिक्षक यांनी त्या विद्यार्थ्यांना दम दिल्याचे व शाळेत न येण्याची तंबी दिलेली आहे. पोलिसात या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मात्र विद्यार्थ्यांपर्यंत नेमके हे ड्रग्स येतात कुठून हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

शहरात मागील अनेक वर्षापासून ड्रग्ज व गांजा विक्री करणारे रॅकेट सक्रीय असल्याची कूनकुन आहे. गांजा विक्री करणाऱ्या रॅकेटने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर आपला फास आवळला असून त्यांना नियमित ग्राहक बनविले आहे. विशेष म्हणजे मैत्रीच्या नावाखाली अनेक विद्यार्थीनींना देखील त्यांनी गांजाची लत लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एका दुसऱ्या प्रकरणात दिनांक १४ फेब्रुवारी २०२३ ला स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत गांजा विक्रीबाबत गुन्हा उघडकीस आला असून कलम ८(क), २०(ब) ii (अ) गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act) १९८५ अन्वये गुन्हा नोंद झाला आहे. यावरून भद्रावती शहरात गांजा विक्री होत असल्याचा पुरावा मिळाला आहे.

ड्रग्स व गांजा सोबत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व्हाईटनर मधील थीनर चा उपयोग नशेसाठी करीत आहेत. हे थीनर सहजतेने उपलब्ध होत असून त्यांची किंमत पण कमी असल्याने अनेक शालेय विद्यार्थ्यांनी नशेसाठी थीनरचा उपयोग सुरू केला आहे. रूमालावर व कपड्यावर थीनरचे थेंब टाकून हे विद्यार्थी त्यांचा दीर्घ श्वास घेतात. त्यामुळे त्यांना चांगलीच नशा चढते. व्हाईटनर हे बुकस्टॉल, जनरल स्टोर्स येथे सहजतेने उपलब्ध होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना या नशेची सवय जडली आहे. आपला पाल्य या नशेच्या आहारी तर गेला नाही ना याची खातरजमा सुज्ञ पालकांनी वेळोवेळी करीत राहायला पाहिजे. विद्यार्थ्यांना या नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान पालक व शाळा तथा पोलीस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

*से नो टू ड्रग्ज इन दि सिटी : रवींद्र शिंदे*

जिल्ह्यात विद्यार्थी जीवनात घडत असलेला सदर प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या वयात आयुष्याला वळण देवून यश गाठायचे असते. त्या वयात तरुण ड्रग्ज व गांजाच्या विळख्यात जात आहे. वरोरा व भद्रावती हे सामाजिक तथा ऐतिहासिक वारसा जपणारे पवित्र शहर आहे. या शहरात हे होणे म्हणजे ही बाब गंभीर आहे. विद्यार्थी, पालक, जागृक नागरीक, शाळा प्रशासन, पोलीस प्रशासन तथा तालुका प्रशासन यांनी सतर्क होवून सर्वांच्या सहाय्याने ड्रग्ज व गांजाला शहरातून हद्दपार करूया. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) विद्यार्थी व तरुणांच्या आयुष्याशी सुरू असलेला नशेचा खेळ कदापी खपवून घेणार नाही. प्रसंगी यासाठी रस्त्यावर उतरून आक्रमक पवित्रा घेवू असे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे प्रमुख रवींद्र शिंदे म्हणाले.