मुल येथे युवकांना मार्गदर्शन तथा गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा

14

मुल :

आपल्या ओजस्वी, विनोदी शैलीतून विविध गंभीर विषय अभ्यासपूर्ण पध्द्तीने हाताळणारे सुप्रसिध्द वक्ते तथा प्रेरणादायी मार्गदर्शक प्रा. नितेश कराळे यांचा युवक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम स्थानिक कर्मवीर कन्नमवार सभागृह येथे येत्या शुक्रवार रोज ९ ऑगस्ट ला सकाळी ११:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. सोबत गोंडवाना विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रशांत ठाकरे यांचेही ओघवते प्रेरणादायी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. यानिमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. सदर उपक्रम संतोष सिंह रावत मित्र परिवार तर्फे राबविण्यात येत आहे.

संतोष सिंह रावत मित्र परिवार तर्फे मुल, पोंभुर्णा, बल्लारपूर परिसरात विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविल्या जात आहे. अनेक गरीब, गरजू, शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, विद्यार्थी यांचे करीता त्यांचे मदत कार्य सुरू असते. सामान्य घरातील मुले शैक्षणिक कारकिर्दीत असामान्य कर्तृत्व सिद्ध करतात. त्यांचा गुणगौरव होणे आवश्यक आहे तथा त्यांना पुढील शैक्षणिक वाटचाली करीता मार्गदर्शन मिळणेही आवश्यक आहे. या हेतूने सदर मार्गदर्शन व गौरव सोहळा आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

प्रा. नितेश कराळे यांचा त्यांच्या मार्गदर्शनातून विदर्भातील अनेक विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे. सदर उपक्रमातून मुल येथील विद्यार्थ्यांना असाच लाभ होणार आहे, त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संतोष सिंह रावत यांनी केले आहे.