भद्रावतीचा कचरा बरांज मानोरा वासियांच्या उंबरठ्यावर

18

भद्रावती :

दुकानातून वेस्टेज निघणारे काही व्यावसायिक शहराच्या बाहेर नागपूर रोड लगत व बरांज तथा मानोरा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांच्या व्यवसायातील वेस्टेज साहित्य तथा कचरा आणून फेकतात. त्यातल्या त्यात शहरात मेलेली जनावरे सुध्दा या रस्त्यालगत फेकले जातात. परिणामी त्या रस्त्यावर दुर्गंधी व घाण पसरलेली असते. याचा त्रास तिथून जाणारे बरांजवासी, मानोरावासी व प्रवाशांना होत आहे. रोगराई वाढण्याची भीती आहे. त्यामुळे भद्रावतीचा कचरा बरांज मानोरा वासियांच्या उंबरठ्यावर फेकणे बंद करण्याची मागणी ग्रामवासी करीत आहे.

भद्रावती शहरालगत नागपूर रोड पासून मानोरा, बरांज कडे जाणारा रस्ता आहे, या गावाकडे जाणाऱ्या टर्निंगला मानोरा फाटा म्हणून संबोधल्या जाते. या फाट्यावर शहरातील मेलेली जनावरे आणून टाकल्या जातात. मांस विक्रेते कोंबळे व बकऱ्याचे आतळे, पिसे आणून फेकतात. केश कर्तन करणारे व्यावसायिक केस आणून टाकतात. कॅटरिंग व्यावसायिक शिळे अन्न आणून टाकतात. प्लास्टिक चा कचरा देखील येथे टाकल्या जातो. यामुळे येथून जाण्या-येणाऱ्या प्रवाशास व ग्रामवासियांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. अक्षरशः त्या दुर्गंधीने एखाद्याला उलटी व्हावी, अशी परिस्थिती असते. रस्त्याबाजूला सतत घाण साचलेली असते. रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

महत्वाचे म्हणजे याकडे नगर प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष आहे. नगर प्रशासनाने शहर तर घाणेरडे ठेवलेच आहे, मात्र शहराबाहेर पडणाऱ्या घाणीकडे दुर्लक्ष करुन नजीकच्या गावांना नाहक त्रास निर्माण होवू देत आहे.

घण कचरा प्रकल्पाचा गाजावाजा करणारी नगरपालिका तिच्या क्षेत्रातील टाकावू ओला व सुका कचरा जेव्हा शहराबाहेर फेकल्या जाताना बघ्याच्या भूमिकेत असते, तेव्हा तिच्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. व्यवसायिकांनी देखील त्यांच्या दुकानातील टाकावू पदार्थ व कचरा उघड्यावर रस्त्यालगत टाकू नये, यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.

अशाप्रकारे तुमच्या शहरातील कचरा आमच्या गावाच्या उंबरठ्यावर टाकण्यावर बंदी आणावी, नगर प्रशासनाने या समस्येकडे लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.