भद्रावती :
निप्पॉन डेंड्रो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, शासन तथा प्रशासनाच्या दडपशाही विरोधात व स्थानिक बेरोजगार युवक युवतींना नोकरीत सामावून घेण्यासाठी उद्या दिनांक १७ मार्चला सकाळी १० वाजता स्थानिक नागमंदिर ते तहसील कार्यालय पर्यंत निप्पॉन प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे भव्य मोर्चा काढण्यात येत आहे.
लढा शेती, माती आणि बेरोजगारांसाठी या टॅगलाईन सह या मोर्चात तालुक्यातील मौजा विजासन, रुयाड (रिठ), पिपरी (देश.), टोला, चारगांव, लोणार (रिठ) तेलवासा, कुनाडा, चिरादेवी व ढोरवासा येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुंबासह सहभाग घेणार आहेत.
प्रती एकर दहा लाख रुपये अनुदान, अडीच एकरामागे एक नोकरी व कंपणी, एमआयडीसी आणी प्रकल्पग्रस्तांमधे त्रीपक्षीय लेखी करार करणे, या प्रमुख मागण्यांना घेऊन निप्पॉन प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती सदर मोर्चा काढत आहे.
३० वर्षांपूर्वी जवळपास १० गावातील शेतजमिनी निप्पॉन डेंड्रो प्रकल्पासाठी एमआयडीसी अंतर्गत संपादित करण्यात आल्या मात्र कोणताच प्रकल्प तिथे आला नाही. त्यामुळे प्रकलग्रस्त शेतकऱ्यांच्या एका पिढीचे नुकसान झाले. आता नव्याने काही कंपन्या याच संपादित जमिनीवर येऊ घातल्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या काही मागण्या आहेत. मात्र त्या मागण्यांवर सनदशीर मार्गाने तोडगा काढण्यापेक्षा प्रशासनातर्फे चर्चा व बैठकांचा फार्स सुरु आहे. तथा प्रकल्पग्रस्तांवर चुकीचे गुन्हे लादून हद्दपारीसारखी दडपशाही केल्या जात आहे. या सर्व प्रकाराच्या विरोधातही हा मोर्चा असल्याचे निप्पॉन डेंड्रो प्रकल्पग्रस्तांनी सांगितले आहे.