भद्रावती :
केंद्र व राज्यात सत्ता, पक्षाचे पालकमंत्री, स्थानिक आमदार, माजी केंद्रीय मंत्री तथा केंद्रीय आयोगाचे अध्यक्ष, वरोरा विधानसभा प्रमुख, निवडणूक पूर्व पक्षाचे शहरातील उल्लेखनीय संघटन या सर्व जमेच्या बाजु असूनही केवळ तिकीट वाटप चुकल्याने भारतीय जनता पक्षाला स्थानिक नगरपालिका निवडणुकीत जोरदार झटका बसला आहे. नगराध्यक्षासह भारतीय जनता पक्षाच्या तब्बल २७ उमेदवारांना पराजय पत्करावा लागला. भाजपचे केवळ दोन उमेदवार निवडून आले. मागील पंचवार्षिक निवडणुकीचा ग्राफ देखील पक्षाला सांभाळता आला नाही. या निकालाने सरसकट इनकमिंग घेणाऱ्या पक्षाला आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
२०१८ च्या सार्वत्रिक नगरपालिका निवडणुकीत भाजपचे चार उमेदवार निवडून आले होते. आणि बऱ्याच उमेदवारांना केवळ ५० च्या आत मतांवर पराजय स्वीकारावा लागला. म्हणजे पक्षाच्या मतदारांचा टक्का वाढला होता. निवडणूक पूर्व काळात पक्षाची शहरातील स्थिती भक्कम होती. पक्षाला शहरात पोषक वातावरण होते. पालिका स्थापनेपासून गेल्या २८ वर्षात झाले नाही, ते यावेळी होईल, पक्ष शहरात इतिहास घडवेल, पालिकेवर पक्षाची सत्ता बसेल असे चित्र होते. मात्र स्वतः नगराध्यक्ष व नगरसेवक बनण्याच्या स्पर्धेतच पक्षाची मंडळी खुश होती. मात्र पक्षाची सत्ता पालिकेवर स्थापन व्हावी, यासाठी कुणीच प्रयत्नरत राहून सूक्ष्म नियोजन करताना दिसले नाही. शहरात न राहणाऱ्या जेष्ठ व मोठ्या नेत्यांनी तिकीट वाटपाची सूत्रे हातात घेतली. विजयी होऊ शकणाऱ्या उमेदवारांना तिकीट वाटप झाले नाही, त्याची परिणीती निकालात दिसली.
१५ वर्षे भद्रावती नगरपालिकेत एकहाती सत्ता असलेले मात्र शहराच्या विकासात भर टाकू न शकलेले, शिवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी असा प्रवास करुन आलेले, शहरात मोठ्या प्रमाणात अँटी एन्कमबंशी असलेले अनिल धानोरकर यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश देऊन व नगराध्यक्ष पदाची तिकीट देऊनच भाजपाने पहिली चूक केली. पक्षातील निष्ठावंतांना नाराज करुन पालिकेची लढाई लढायला निघालेल्या भाजपने नगरसेवक पदाच्या उमेदवाऱ्या देखील समाधानकारक दिल्या नाही. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची झड नगरसेवकांना पडली, अशातच पक्षाचे शहर अध्यक्ष सुनील नामोजवार यांनी पक्षाला वंदे मातरम् करुन काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेतली आणि सुरवातीपासूनच भाजपचा प्रवास बॅकफूटवर आला. प्रचारादरम्यान दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा देखील फार प्रभाव पाडू शकली नाही. स्थानिक आमदार करण देवतळे, वरोरा विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर, केंद्रीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, पालकमंत्री प्रा. अशोक वुईके ही तगडी टीम असूनही भाजप शहरात करिष्मा दाखवू शकली नाही आणि याही वेळेस पक्षाला पालिकेत सत्ता स्थापन करता आली नाही.
आतातरी भाजपने आत्मचिंतन करावे, पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना सन्मान द्यावा, आयारामांच्या भरोषावर पक्षाची दारोमदार ठेवू नये, तिकीट वाटपात स्थानिकांना विश्वासात घ्यावे, शहराबाहेरील मंडळींनी कुरघोडी करु नये, अशी अपेक्षा पक्षातील ज्येष्ठ मंडळींची आहे.
*भद्रावती शिवसेनेचीच (शिंदे गट) पुन्हा एकदा सिद्ध*
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या भद्रावती शहरात पालिका निवडणुकीच्या निकालानंतर शिंदेसेना हीच खरी शिवसेना असल्याचा प्रत्यय आला आहे. शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार प्रफुल चटकी नगराध्यक्ष पदावर निवडून आले. शिंदेसेनेचे सर्वाधिक म्हणजे १२ उमेदवार निवडून आले. भद्रावती शिवसेनेचीच (शिंदे गट) पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. खरी शिवसेना शिंदेसेनेची असल्याचा कल येथील मतदारांनी दिला आहे.
*वंचित व मुस्लिम गठ्ठा मतांच्या जमेच्या बाजुत काँग्रेसचा उमेदवार चुकला; खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सिद्ध केली राजकीय अपरिपक्वता*
काँग्रेसने भाजपचा चेहरा आयात करुन ऐनवेळेवर खेळलेली राजकीय खेळी चुकली. वंचित व मुस्लिम मतदारांची साथ असूनही काँग्रेसला नगराध्यक्ष विजयी करता आला नाही. शिवसेनेच्या नगराध्यक्ष विजयी उमेदवारापेक्षा काँग्रेसच्या सुनील नामोजवार यांना केवळ ८२९ मते कमी पडली. विधानसभेत स्वतःच्या भावाला तिकीट दिल्यानंतर, स्थानिक नगरपालिकेत कुणबी बहुल लोकसंख्या असलेल्या शहरात नगराध्यक्ष पदाकरीता कुणबेत्तर चेहरा देऊन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आणखी एकदा राजकीय अपरिपक्वता दाखविली. त्याचा फटका काँग्रेस, वंचित व राष्ट्रवादी (शरद पवार) यांना बसला. कुणबी चेहरा दिला असता तर काँग्रेसचा उमेदवार नगराध्यक्ष झाला असता, असे निकालाचे आकडे पाहून लक्षात येते.











