जंगल सफारीला येणाऱ्या सेलिब्रिटींनी व पर्यटकांनी ताडोबा सोबतच जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसांना भेटी द्याव्या : सुयोग भोयर, संचालक, वन स्टेप सोल्युशन

85

भद्रावती : तालुक्यातील ताडोबा या अभयारण्यात येणाऱ्या प्रत्येकाला वाघ बघण्याचे आकर्षण असते. येथील जंगल सफारीची मौज काही वेगळीच असते. यासाठी राज्यातून व राज्याबाहेरून अनेक सेलिब्रिटी, राजकारणी, खेळाडू व विविध क्षेत्रातील दिग्गज तथा पर्यटक हे नेहमीच ताडोबा जंगल सफारीला येत असतात व ताडोबा येथूनच ते परत निघून जातात. मात्र ताडोबा व्यतिरिक्तही या जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक खाणाखुणा आहेत ज्या बघण्यासारख्या आहेत. ताडोबा सोबतच जिल्ह्यातील हेरीटेजला जर बाहेरून येणाऱ्या सेलिब्रिटींनी भेटी दिल्या तर जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा त्यांना बघता येईल. सोबतच स्थानिक ऐतिहासिक व पुरातन स्थळांना अच्छे दिन येतील. नुकतेच भारतरत्न सचिन तेंडुलकर हे ताडोबा सफारी करीता आले होते. यावेळी वन स्टेप सोल्युशनचे संचालक तथा स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सुयोग भोयर यांनी त्यांची भेट घेतली व या कल्पनेवर त्यांच्याशी चर्चा केली.

या भेटीदरम्यान त्यांनी तेंडुलकर यांना बांबू पासून बनविलेली सपत्नीक प्रतिमा तथा नैसर्गिक शुध्द शहद भेट स्वरूपात दिले. सोबतच ताडोबा हे अभयारण्य भद्रावती तालुक्यात येत असून भद्रावती हे एक ऐतिहासिक शहर आहे. या शहरात त्रिधर्मीय संगमासोबताच अनेक ऐतिहासिक धार्मिक व पुरातत्वीय वास्तू असल्याची माहिती दिली. पुढल्या वेळेस आल्यावर या सर्व पुरातन वास्तू, लेणी, शिल्प, मंदिरे बघण्याकरीता भद्रावती नगरीला भेट द्यावी, असे आमंत्रण वन स्टेप सोल्युशनचे संचालक सुयोग भोयर यांनी दिले. या आमंत्रणास तेंडुलकर यांनी प्रतिसाद दिला व येण्याचे कबूल केले.

वन स्टेप सोल्यूशन हे पर्यटकांना ताडोबा जंगल सफारी सोबतच त्यांच्या यजमान पदाची जबाबदारी घेवून व्यवस्थापन करण्याचे कार्य मागील काही वर्षांपासून करीत आहे.