गावकर्‍यांचा विश्वासघात करीत अरबिंदोला नाहरकत देणार्‍या उपसरपंचावर अविश्वास पारीत

170

भद्रावती :

साम दाम दंड भेद अशा सर्वच नितीचा अवलंब करीत अरबिंदो रिअ‍ॅलीटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा. लि. खासगी कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करीत असून कंपनीचा एक कुटील डाव गावकर्‍यांसमोर आल्याने प्रकल्पग्रस्त गावकरी संतप्त झाले आहे.

संतप्त गावकर्‍यांनी ताबडतोब ताडाळी गावात ग्रामसभा बोलवत उपसरपंचावर अविश्वास प्रस्ताव पारीत करीत आपल्या संतापाला मोकळी वाट केली आहे. उपसरपंच गावातून फरार झाला असून नॉटरिचेबल आहे.

भद्रावती तालुक्यातील बेलोरासह आठ गावाची जमिन खासगी कोळसा कंपनीला देण्यात आली आहे. कंपनीने उपसरपंचाला हाताशी धरुन गावकर्‍यांचा विरोध असताना देखील ग्रामसभेची कंपनीच्या खोदकामाला नाहरकत दिली आहे. या ठरावात सरपंच व सचिवाची बनावट सही मारण्यात आली आहे. हि बाब काल गावकर्‍यांच्या समोर कंपनी व्यवस्थापनाने आणल्याने गावकर्‍यांना मोठा धक्का बसला. उपसरपंच प्रविण बांदुरकर यांनी गावकर्‍यांना अंधारात ठेवत अरबिंदो कंपनीकडून मोठी लाच घेऊन गावकर्‍यांचा विश्वासघात केला असल्याने गावात तणाव निर्माण झाला असून गावकरी उपसरपंचाचा शोध घेणे सुरु केले आहे. उपसरपंचाने आपली पोल खुलली असल्याचे माहित होताच गावातून पोबारा करीत मोबाईल देखील बंद केला आहे.

अरबिंदो खासगी कोळसा कंपनी अत्यल्प दरात प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी हडपण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून कट कारस्थान करीत आहे. कंपनीने लोकप्रतिनिधींना धनशक्तीने आपल्या काबूत केले असून महसुल तसेच पोलिस प्रशासन देखील कंपनीच्या इशार्‍यावर नाचत आहे. अशा वेळेस गावकर्‍यांनी आपला एकाकी लढा सुरु केला आहे. अरबिंदो कंपनीने काम गावकर्‍यांनी वेळोवेळी रोखले. कंपनीने काही गुंडाना घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला असता गावकर्‍यांनी देखील तेवढ्याच प्रखर लढा देत अरबिंदो कंपनीला हुसकावून लावले. अगोदर शेत जमिनीचा दर ठरवा नंतरच कंपनीने काम सुरु करा अशी भुमिका गावकर्‍यांनी घेतली आहे. अशा तणावपूर्ण वातावरणात कंपनीने ग्रामपंचायतची खोदकामास नाहरकत प्रमाणपत्र गावकर्‍यांसमोर आणल्याने गावकर्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली. संतप्त गावकर्‍यांनी ठरावाची प्रत पाहल्यानंतर गावकर्‍यांचा विश्वासघात करीत कंपनीला नाहरकत प्रमाणपत्र देणार्‍या उपसरपंचावर आज ताबडतोब ग्रामसभा घेत अविश्वास ठराव पारीत केला आहे. बनावट ठरावा विरोधात पोलिस तक्रार देखील करण्यात येणार आहे.