चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा आज दिनांक २१ डिसेंबर २०२४ पासून सुरु झाली आहे. आज दिनांक २१ डिसेंबर २०२४ ला पहिल्याच दिवशी सकाळ पाळीतील चपराशी पदाकरीता होणारी लेखी परीक्षा सुरू असताना काही तांत्रिक अडचणींमुळे रद्द करण्यात आलेली आहे. तथा आज (दि. २१) ला ज्या परीक्षार्थींच्या चपराशी पदाकरीता लेखी परीक्षा होणार होत्या त्या लवकरच घेण्यात येणार आहे. त्याबाबत अद्ययावत सूचना व प्रवेश पत्र बँकेच्या वेबसाईट वर टाकण्यात येणार आहे. परीक्षार्थींनी वेबसाईट वर जावून दिलेल्या सूचनांची माहिती करुन घ्यावी व दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. सोबतच रद्द झालेल्या शिफ्ट मधील परीक्षार्थींच्या भ्रमणध्वनी वर संबंधित आयटीआय कंपनी पुढील सूचनेचा संदेश देतील. तरी याबाबत बँक प्रशासनातर्फे परीक्षार्थींना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे, असे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांनी सांगितले आहे.
आज (दि. २१) ला पहिल्या शिफ्ट मधे चपराशी पदाकरीता होणारी परीक्षा सुरू झाली असता ऐन वेळी तांत्रिक बिघाडामुळे परीक्षार्थी देवू शकले नाही. त्यामुळे दोन्ही शिफ्ट मधील लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. यासाठी बँक प्रशासन कुठेही जवाबदार नाही. हा एक तांत्रिक बिघाडीचा विषय आहे. परीक्षा घेणारी कंपनी सदर विषय हाताळत आहे. यात कुठलाही मानवी हस्तक्षेप नाही. तरी यात तांत्रिक सुधारणा करून पुढील शिफ्ट मधील संपूर्ण परीक्षा प्रक्रिया प्रामाणिकपणे व पारदर्शक पध्द्तीने राबविण्यात येईल. परीक्षार्थींनी गोंधळून जावू नये, असेही राजेश्वर कल्याणकर म्हणाले आहेत.
दिनांक २२ व २३ डिसेंबर ला होणाऱ्या सर्व शिफ्ट मधील परीक्षा जैसे थे असतील. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. परीक्षार्थींनी अफवांना बळी पडू नये. कोणत्याही खोट्या वृत्ताने गोंधळून जावू नये. भरती प्रक्रिया ही न्यायालयाच्या निर्देशानुसार होत आहे, हे महत्त्वाचे, असेही कल्याणकर म्हणाले.