जीवन प्रमाणपत्र देण्यास बँक ऑफ महाराष्ट्रचा नकार

7

तालुका प्रतिनिधी,
भद्रावती, दि.२६ : शहरातील सेवा निवृत्ती जेष्ठ नागरिकांनी बँका जीवन प्रमाणपत्र देण्यास नकार देत असल्याची तक्रार ग्राहक पंचायत भद्रावती कडे केली. त्या तक्रारीच्या अनुशंगाने दि. २५ नोव्हेंबर ला ग्राहक पंचायत भद्रावती ने स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया यांना पत्र देऊन जीवन प्रमाणपत्र न देण्याच्या कारणाची विचारणा केली.
शहरात सहा राष्ट्रीयकृत बँका असून ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथील सेवा निवृत्त नागरिकांचे पेंशन खाते हे बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया मध्ये सर्वाधीक आहे. मागिल काही दिवसात शासनाने ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथील सेवा निवृत्त नागरिकांचे पेंशन खाते हे स्पर्श ला स्थलांतरित केल्यामुळे स्थानिक बँका सेवा निवृत्त पेंशन धारकांना जीवन प्रमाणपत्र देण्यास नकार देत आहे. बँकेच्या सांगण्यावरून सर्वांना जीवन प्रमाणपत्र हे सेतू मधुन काढावे लागत आहे. त्यासाठी नागरिकांना १०० ते २०० रूपये खर्च करावे लागते. बँकेचे ग्राहक या नात्याने तसेच शासन नियम २०२३ नुसार बँकेने जीवन प्रमाणपत्र देणे बंधणकारक असून सुद्धा बँका जीवन प्रमाणपत्र देण्यास नकार देत आहेत.
त्यामुळे ग्राहक पंचायत ने तिन्ही बँकांना पत्र देऊन विचारणा केली असता स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया यांचे शाखा प्रबंधकांनी जीवन प्रमाणपत्र बँकेकडून करून देण्यास सहमती दिली असून बँक ऑफ महाराष्ट्र चे शाखा प्रबंधक यानी नकार दिला. त्यामुळे शासन नियमाची पायमल्ली करून स्वतः चे नियम लावणाऱ्या आणि अरेरावीची भाषा करणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र चे शाखा प्रबंधकाची तक्रार ग्राहक पंचायत भद्रावती ने जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चंद्रपूर, बँक लोकपाल आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया कडे केली आहे.
सर्व बँकांना पत्र देते वेळी ग्राहक पंचायत चे पदाधिकारी बालाजी दांडेकर, प्रविण चिमुरकर, वसंत वर्हाटे, वामन नामपल्लीवार, शेखर घुमे आणि डॉ. उत्तम घोसरे उपस्थित होते.

सर्व जेष्ठ नागरिक, सेवा निवृत्त कर्मचारी यांनी जीवन प्रमाणपत्रासाठी शक्यतो बँकेच्या शाखा प्रबंधकांशी भेट घ्यावी. ग्राहकांच्या अधिकाराचा वापर करावा. जर कोणत्याही बँकेने जीवन प्रमाणपत्र देण्यास नकार दिला तर बँक लोकपाल किंवा ग्राहक पंचायत कडे लेखी तक्रार द्यावी.

प्रविण रामचंद्र चिमुरकर
सचिव, अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती तथा सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, चंद्रपूर