चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना पीक नुकसान भरपाई द्यावी

33

चंद्रपूर = जिल्ह्यात सर्वत्र सतत धार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झालेले आहे. ऐन खरीप हंगामातील पिके बहरलेले असताना जोरदार अती अतिवृष्टी झाल्याने शेतीतील हजारो हेक्टर पीक क्षेत्र जलमय होऊन शेतकरी बांधवांचे फार मोठे नुकसान झाले आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई द्यावी .अशी मागणी शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे वरोरा आणि राजुरा विधानसभा क्षेत्र जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या एका निवेदनातून केलेली आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांनी सदर निवेदनात असे नमूद केले आहे की, जिल्ह्यात असलेल्या कोळसा खाणी आणि महाऔष्णिक विद्युत केंद्र यामुळे फार मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. या प्रदूषणाचा फटका सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याला बसत आहे. त्याचबरोबर कोळसा खाणी आणि महा औष्णिक विद्युत केंद्र च्या माध्यमातून होणाऱ्या प्रदूषणाचा प्रतिकूल परिणाम जिल्ह्यातील शेत पिकावर होत असून शेतीची पिक उत्पादन क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. शासन स्तरावर या समस्येचा विचार सुध्दा तेवढाच गांभिर्यपूर्वक झाला पाहीजे. या समस्येवर शासनाने प्रभावी उपाय योजना केली पाहीजे.
चंद्रपूर जिल्हयात ही समस्या शेतकरी बांधवांना सतत भेडसावत असताना अलीकडे झालेल्या तसेच सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेत पिकांची अतोनात हानी झाली आहे. तसेच जिल्ह्यात असणाऱ्या कोळसा खाणीच्या ओवर बर्डन मातीमुळे रचलेल्या ढिगार्‍याचा प्रतिकूल परिणाम म्हणून जिल्ह्यातील नदी व नाले यांचे नैसर्गिक प्रवाह अडचणीत आल्याने कित्येक ठिकाणी पूर परिस्थिती गंभीर झालेली आहे. यामुळे प्रत्येक पावसाळ्यात हजारो हेक्टर पिक क्षेत्र जलमय होत असून शेत पिकांचे फार मोठे नुकसान होत आहे. या समस्ये याबाबत पिडीत जनतेनी जिल्हा व वेकोली प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची उचित कार्यवाही झालेली नसल्याने ही पूर परिस्थिती आणखीनच गंभीर रूप धारण करीत आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना वेकोलि प्रशासना कडून सुद्धा पिक नुकसान भरपाई देण्यात यावी. असे असेही सदर निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात शेतकरी बांधवांनी वेळोवेळी पीक विमा काढला असून पिक विमा कंपन्यांकडून मात्र दिरंगाई करण्यात येत असल्याने या योजनेचा लाभ योग्य प्रकारे शेतकरी बांधवांना मिळत नाही. तरी जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी शासनाने अलीकडील आणि सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रशासनाच्या मार्फतीने वेळीच पंचनामे करून सबंधितांना नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांनी केली आहे. सदर निवेदनाच्या प्रती शिवसेना ( उ. बा. ठा. ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, यांच्यासह शिवसेनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांना तसेच जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा पाठवलेल्या आहे.