भद्रावती शहरात विजेचा लपंडाव.. नागरिक त्रस्त…!

28

भद्रावती :

भद्रावती शहरात तापमानाचा पारा चाळिशीच्या पार जात आहे. रात्री देखील ३० ते ३५ अंशावर तापमान राहत असल्याने नागरिक अधिकच त्रस्त आहेत. त्यामुळे दिवसा तसेच रात्री अंगाची होणारी लाहीलाही टाळण्यासाठी सर्वच जण पंखे, कूलरचा गारवा घेत आहेत. अशातच भद्रावती शहर तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागात ठिकठिकाणी विजेच्या लपंडावाचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ना घरात थांबू शकतो, ना घराबाहेर जाऊ शकतो, अशी अवस्था होत आहे. असाच अनुभव मागील काही दिवसांपासून शहरातील नागरिक घेत आहेत.

याचा परिणाम पाणी पुरवठयावर देखील होत आहे. विजेवर चालणारे व्यवसाय डबघाईस येत आहेत. सध्या शेती व शाळेचा काळ आहे, त्यामुळे ऑनलाईन ची कामे बाधित होत आहेत. वारंवार विजेचा लपंडाव सुरू असल्याने विजेची उपकरणे बिघडत आहेत. त्यामुळे सर्वच स्तरावर मोठे नुकसान होत आहे. विजेअभावी लहान मुले, वृद्ध, रुग्ण कमालीचे त्रस्त होत असून महावितरणकडून विद्युत ग्राहकांना चोविस तास वीज उपलब्ध व्हावी, अशी नागरिकांना अपेक्षा असते. परंतु शहरात वेळीअवेळी वीज पुरवठा खंडीत होत असल्याने वीज ग्राहकांचा मागील अनेक दिवसांपासून अपेक्षाभंग होत आहे. अशात महावितरणच्या अभियंत्यांना कॉल केला असता त्यांचा नंबर नॉट रीचेबल दाखवतो.

मात्र याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे, तर दुसरीकडे वीज बिलाची मात्र सुलतानी वसुली सुरू असल्याचे बोलल्या जात आहे. असा खेळखंडोबा सुरू राहिला, तर नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. एखाद्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर गावात अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरणने ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित होणार नाही, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.