वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात अनेकांना आमदारकीचे डोहाळे.

13

प्रा. रविकांत वरारकर
भद्रावती :

नुकतीच लोकसभा निवडणुक पार पडली. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ऐतिहासिक बहुमत मिळाले. अर्थातच हे बहुमत म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या मागील दहा वर्षाच्या कारकिर्दीतील धोरणाविरोधात जनतेत तयार झालेल्या नकारात्मकतेचा परीणाम होय.

महाविकास आघाडीच्या लोकसभा उमेदवार प्रतिभा धानोरकर या वरोरा विधानसभेच्या आमदार होत्या. त्या लोकसभेत निवडून गेल्याने वरोरा विधानसभा क्षेत्र आमदार रहित झाले. विद्यमान आमदार खासदार बनल्याने विधानसभेच्या आमदारकी करीता नविन चेहऱ्याला संधी मिळणार आहे. परिणामी वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात इच्छुक भावी आमदारांची संख्या वाढली आहे. अनेक छोट्या मोठ्या नेत्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर आपल्या नेत्याचे भावी आमदार म्हणून ग्राफिक्स शेअर करीत आहेत. राज्यात व जिल्ह्यात महाविकास आघाडीला आलेले अच्छे दिन पाहता काँग्रेस, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षातील नेतेमंडळी उमेदवारी मिळावी या दिशेने कार्यरत झाले आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षात देखील नेतेच नेते आहेत. सध्याच्या राज्यातील व जिल्ह्यातील निकालानंतर भारतीय जनता पक्षातील नेते जरी हिरमुसले असले तरी मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाची उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी नेतेमंडळी कंबर कसून आहेत.

नुकत्याच झालेल्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत वरोरा विधानसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला १,०४७५२ तर महायुतीच्या उमेदवाराला ६७,७०२ इतकी मते मिळाली आहेत. म्हणजे वरोरा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा उमेदवार ३७,०५० मतांनी आघाडीवर आहे. म्हणून महाविकास आघाडी कायम राहिल्यास आगामी वरोरा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा आमदार होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

महाविकास आघाडीला मिळालेल्या १,०४७५२ या मतांमध्ये काँग्रेस, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षांच्या मतांचा कमी अधिक सहभाग आहे. मात्र महायुतीला मिळालेली ६७,७०२ मते ही ९५% भारतीय जनता पक्षाची मते आहेत, असे म्हणता येईल. आणि वरोरा विधानसभा क्षेत्रातील या अगोदरचा इतिहास बघता ६७,७०२ मते ही विधानसभा उमेदवाराकरीता विनिंग मते आहेत. त्यामुळे जर आगामी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीत बिघाडी पडली व तीनही किंवा दोन पक्ष स्वतंत्र लढले तरी महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन होईल व भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येवू शकतो, असे आकडे सांगतात.

दुसरे असे की, कुणबी बहुल असलेले वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील कुणबी समाजाच्या विद्यमान आमदार या खासदार बनल्याने काँग्रेस पक्षात स्थानिक पातळीवर विधानसभा उमेदवारी करीता नविन नेतृत्वाची गरज आहे. लोकसभा निवडणुकीत कुणबी समीकरण तयार झाल्याने या समाजातील अनेक जण उमेदवारी घेण्यास इच्छुक झाले आहेत. विधानसभा क्षेत्राच्या बाहेरून देखील या विधानसभा क्षेत्रात नशीब आजमवायला काहीजण रणनीती आखत असल्याचे समजते.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला वरोरा विधानसभेची उमेदवारी गेल्यास या पक्षाकडून काम करणाऱ्या नेतृत्वाला संधी मिळू शकते.

अनेक पार्सल उमेदवार देखील वरोरा विधानसभा करीता इच्छुक असल्याचे दिसून येते.

तूर्तास विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदार लोकसभेत गेल्याने नविन नेतृत्वास संधी आहे. सातत्यपूर्ण जनतेची कामे करणाऱ्या नविन उमेदवारास पक्षाची जोड मिळाल्यास त्याला आमदारकीचा मार्ग सुकर होवू शकतो, असे चित्र आहे.