बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिडेल ओबीसी वसतीगृहात प्रवेश 

99

चंद्रपूर : 

इतर मागास बहुजन कल्याण खात्यामार्फत चालवण्यात येणाऱ्या वसतिगृहात व्यावसायिक आणि बिगरव्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. शिंदे-फडणविस राज्य सरकारच्या या निर्णयाचे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी स्वागत केले आहे.

ओबीसींचे वसतिगृह केवळ व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांसाठी उपलब्ध होईल, अशी अट असल्याने अन्य विद्यार्थ्यांचा प्रश्न उपस्थित झाला होता. वरिष्ठ सदस्य छगन भुजबळ यांनी (दि.१५) ला विधानसभेत या प्रश्नाकडे लक्ष वेधले. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भुजबळ यांनी केलेल्या सूचना संबंधित खात्याला देण्यात येतील. वसतिगृहात व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांना प्राथमिकता दिली जाईल, पण इतरांनाही वसतिगृहात प्रवेश देण्यात येईल, असे सांगितले.

राज्य सरकार ‘ओबीसी’, ‘व्हीजेएनटी’ आणि विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींसाठी वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण, या केवळ व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांसाठी असतील, अशी अट घातली होती. अशा स्थितीची अकरावी, बारावी व इतर पदवीधर बिगरव्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांनी काय करावे? असा प्रश्न उपस्थित झाला होता. ५४ टक्के ओबीसींना खूप विलंबाने वसतिगृह मिळत आहे. त्यात अशी अट घालून कसे चालणार. ग्रामीण भागात शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नसल्याने विद्यार्थी शहरात येतात. तेव्हा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांनासुध्दा वसतिगृह प्रवेश दिला गेला पाहिजे, अशी मागणी होती. त्यामुळे या मागणीची दखल घेवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांनाही ओबीसी वसतीगृहात प्रवेश मिळेल, अशी माहिती दिली आहे. या निर्णयाचे ओबीसी विद्यार्थ्यांच्या वतीने डॉ. अशोक जीवतोडे यांनी स्वागत केले आहे.