भद्रावती :
आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व सिद्ध करीत आहे. ती स्त्री आहे म्हणून एखादे धोकादायक काम करू शकत नाही असे म्हणणे चुकीचे ठरत आहे. असाच प्रत्यय सध्या वरोरा भद्रावती तालुक्यात बघायला मिळत आहे. ती नुकतीच आली, कमी वय, जबाबदारीचे पद, स्त्री आहे तर ती खरंच अट्टल गुन्हेगारांवर आळा घालेल का, गुन्हेगारांच्या हद्दीत जावून कामगिरी बजावेल का, या सर्व प्रश्नांना तिने उत्तर देत वरोरा विभागात धडाडीने गुन्हेगारीविरोधात धाडसत्र राबवून अल्पावधीत स्वतःची चुणूक दाखवून दिली. ही कामगिरी आहे वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम यांची.
या पूर्वीचे वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपाणी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अवैध व्यवसायांवर उल्लेखनीय अंकुश मिळविला होता. गुन्हेगारांना सळोकीपळो करून सोडले होते. अनेक धडक कारवाया त्यांनी केल्या होत्या. राजकीय प्रभावाखाली येवून त्यांनी कधीच काम केले नाही. त्यांच्या बदली नंतर आता वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नयोमी साटम यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. आल्या आल्या त्यांनी वरोरा व भद्रावती तालुक्यात अवैध व्यवसायांवर धाडसत्र सुरू केले आहे. नुकतेच त्यांनी भद्रावती शहरात अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या तथा जुगार खेळणाऱ्या गुन्हेगारांवर त्यांच्या हद्दीत जावून धाडसत्र राबविले. त्यात त्यांनी अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या व बरांजतांडा येथे जंगल शिवारात जुगार खेळणाऱ्या गुन्हेगारांना अटक केली.
यातून त्यांनी अवैध व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारांवर जरब बसविला आहे. वरोरा उपविभागात कोणीही गैर कायदेशीर व्यवसाय किंवा कृत्य करू नये, असे आवाहन नयोमी साटम यांनी केले आहे.
त्यांच्याकडून या परिसरातील जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत. वरोरा विभागात कोळसा चोरी, गौण खनिज चोरी, भंगार चोरी, घरफोडी, चैन स्नैचींग, सट्टाबाजारी, औद्योगिक परिसरातील गुन्हेगारी, अवैध मद्य विक्री, सुगंधित तंबाखू विक्री, जुगार अड्डे, अतिक्रमण आदीवर साटम यांच्या माध्यमातून अंकुश बसेल. राजकीय प्रभावाखाली न येता गुन्हेगार व गुन्हेगारी यावर आळा घालून त्या परीसरात शांतता अबाधित ठेवतील असे नागरिकांना वाटते.