विजासनची घरे रस्त्यावरील धुळीने झाली लालमय!

34

भद्रावती – विजासन- देऊरवाडा रस्त्याचे डांबरीकरणाचे काम चालू आहे मात्र या रस्ता बांधकामाला मुरूम टाकण्या ऐवजी कंत्राट दाराने रस्त्यावर लाल माती टाकल्याने संपूर्ण धूळ होऊन ती हवेद्वारे रस्त्यावरील घरात जात असल्याने येथील रस्त्यालगतची घरे धुळीने लालमय झाली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमार्फत विजासन- देऊरवाडा या चार किमी डांबरीकरण रस्त्याचे बांधकाम सुरू आहे या बांधकामासाठी लागणारा कच्चामाल म्हणजेच मुरूम टाकून मजबुतीकरण करण्याची आवश्यकता आहे मात्र त्याऐवजी या ठिकाणी लाल मातीचा वापर केल्या जात आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने जात असताना, तसेच हवेद्वारे ही संपूर्ण लाल माती परिसरातील घरात जात आहे याचा फटका येतील पंधरा घरांना बसला आहे. या रस्त्यावरील धूळ घरातील भांड्यावर कपड्यावर वस्तूंवर तसेच घरातील जेवणावर सुद्धा बसत आहे घरात जेथे पाय ठेवेल तिथे तळ पाय लालमय होत आहे घराची संपूर्ण रंगरंगोटी लालमय झाली आहे. वृक्ष सुद्धा लाल झाले आहे या धुडीमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कंत्राटदारावर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी व त्याचा कंत्राट रद्द करावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, दीपक कावटी, पायल पाटील, शकुंतला बेलेकर, वेलूताई दैवलकर, यशवंत दैवलकर, विजय भोंगळे, विनोद देऊळकर, दिनेश बतखल यांनी केली आहे.