भद्रावती शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य

17

 

भद्रावती :

भद्रावती हे एक ऐतिहासिक व धार्मिक संगम असलेले प्राचीन शहर आहे. या शहरात नगरपालिकेवर सध्या प्रशासन राज आहे. शहराने या अगोदर स्वच्छ व सुंदर असल्याचे पारितोषिक घेतले आहे. मात्र ही स्वच्छता व सुंदरता केवळ स्पर्धेपुरतीच होती का? असा प्रश्न आता शहरवासी विचारत आहे, कारण सध्या शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. परिणामी शहरात नगर प्रशासन अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न पडतो आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे शहराची नियमित साफ सफाई होणे आवश्यक आहे. याच काळात डासांचा प्रादुर्भाव अधिक असतो. रोगराई पसरते. नागरीक आजारी पडतात. दूषित पाणी पुरवठा होण्याची शक्यता असते. घाणीमुळे डुकरांचा हैदोस वाढतो. जनावरांचे मलमूत्र दुर्गंधी घेवून येतात. अशा सर्व परिस्थितीत नगर प्रशासनाला ॲक्टिव मोड वर राहून काम करावे लागते. पण तशी परिस्थिती काही शहरात दिसत नाही. आधीच शहरातील अंतर्गत रस्ते उखडलेल्या अवस्थेत आहेत. नाल्या चोक झालेल्या आहेत. अनेक जागी पाण्याचे डबके साचलेले आहे. जंतुनाशक फवारणी आवश्यक असते. परंतु शहरात नगर प्रशासनाचे ढीसाळ नियोजन दुष्य होत आहे.

नगर पालिकेतील स्थानिक नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने आता माजी नगरसेवक देखील या समस्यांकडे दुर्लक्ष करून आहेत. नंतर निवडणुकीच्या तोंडावर हेच चेहरे उमेदवार बनून जनतेचा कैवारी असल्याचे सोंग घेतील. पण सध्या शहरात असलेल्या घाणी साठी, उखडलेल्या रस्त्यांसाठी, चोक झालेल्या नाल्यासाठी, दुर्गंधी व अव्यवस्थेसाठी कुणीही काम करताना दिसत नाही, ही या शहरातील शोकांतिका आहे.

शहराला कुणीच वाली नसल्याचे चित्र सध्या आहे. शहरात शिस्तबद्धता (discipline) दिसत नाही. एकूणच प्रशासन व नागरीक यात शिस्तीचा अभाव आहे. कुणी कुठेही घाण करतो. कुठेही दुकान थाटून बसतो. काही व्यापारी वर्गाद्वारे फूटपाथ अतिक्रमित आहेत. शहरात पार्किंग ची व्यवस्था नाही. काही व्यापारी संकुलाला पार्किंगच नाही. कुणीही कसेही गाड्या चालवितात. कुठेही ऑटो पार्क असतो. अठरा वर्षा खालील मुले ट्रीपल सीट दुचाकी भर वेगात चालवितात. भाजी बाजारात स्वच्छता नसते. प्लास्टिकचा सर्रास वापर सूरू असतो. विकास कामांचा दर्जा निकृष्ट ठरला आहे. पेव्हींग ब्लॉक उखडले आहेत. पाण्याची डबके साचून आहेत. रस्त्याच्या दुतर्फा भाजी विक्रीची दुकाने थाटलेली असते. उघड्यावर खाद्य पदार्थ व मांस विक्री होते. अवैध मद्य व्यवसाय चालतो. सुगंधित तंबाखू विक्री सुरु असते. कुठे भंगार व्यावसायिकांचे अतिक्रमण आहेत. अधूनमधून झाडांची कत्तल सुरु असते. शहरात केव्हाही विज पुरवठा बंद होतो. या सर्व परिस्थितीवर केवळ प्रशासनच नाही तर शहरवासिंनी देखील चिंतन करण्याची आवश्यकता आहे. नगर पालिका प्रशासनासोबतच पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, वन विभाग, विजवितरण विभाग, आदींनी देखील सक्रिय होणे आवश्यक झाले आहे.